News Flash

ऱ्हुमॅटिक फीव्हर

‘बिटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस’ या जीवाणूमुळे घशाला संसर्ग होतो. तो कमी किंवा जास्त प्रमाणात असतो.

ऱ्हुमॅटिक फीव्हर हा आपण समजतो त्यापेक्षा गंभीर आजार आहे आणि तो टाळण्यासाठी स्वच्छता राखणं, गर्दी टाळणं, घसा, दात हिरडय़ांची निगा राखणं, घसा दुखल्यास वेळीच डॉक्टरकडे जाणं या गोष्टी करण्याची गरज आहे.
हृदयाच्या इतर आजारांमधला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ऱ्हुमॅटिक फीव्हर. (Rheumatic Fever) (सांधेकालीन ताप= संधिवाताचा आजार आणि त्यातून होणारा हृदयविकार). हा सुरुवातीला घशाला इजा, सूज मग सांध्यांना सूज, नंतर हृदयाच्या स्नायूंना आणि झडपांना सूज करणारा आजार आहे. थोडक्यात जंतूंचा घशाला प्रादुर्भाव, मग होणारा संधिवात आणि हृदयविकार याला ‘ऱ्हुमॅटिक फीवर’ म्हणतात.
‘बिटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस’ या जीवाणूमुळे घशाला संसर्ग होतो. तो कमी किंवा जास्त प्रमाणात असतो. कधी लक्षात येतो तर कधी लक्षातही येत नाही. यात ताप येतो, घसा लालसर होतो, गिळताना त्रास होणे, घशाच्या गाठीला सूज येणे यासारखा त्रास होतो.
साधारणपणे ताप व घशाला संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन आठवडय़ांनंतर सांध्यांमध्ये वेदना सूरू होतात, मग एका सांध्यात सूज येते ती बरी झाली की दुसऱ्या सांध्याला सूज येते, याला फ्लीटिंग टाइप ऑफ आर्थरायटिस (Fleeting type of arthritis) म्हणतात. त्याचबरोबर त्वचेखाली तयार होणाऱ्या लहान गाठी किंवा त्वचेवर येणारे लालसर पुरळ, या गोष्टी ऱ्हुमॅटिक फीवर या आजाराचे निदान करण्यास मदत करतात. जर हृदयाला सूज आली असल्यास, नाडीची तपासणी करून, छातीच्या दुखण्यावरून किंवा दम लागल्यावरून नाडीच्या अनियमिततेवरून किंवा हृदयातून येणाऱ्या आवाजावरून (MURMUR), त्याचे निदान करता येते.
लक्षणे आणि शारीरिक तपासणीनंतर ‘ऱ्हुमॅटिक फीवर’च्या आजाराचे निदान सहज करता येते. या आजाराचे निदान करण्यासाठी लक्षणे, तपासणी, शारीरिक आणि रक्ततपासण्या महत्त्वाच्या ठरतात. यांना ‘डॉ. जोन्स क्रायटेरिया’ म्हणतात. रक्ताच्या तपासण्या आहेत १) रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढणे. (white cell counts increase) २) ई. एस. आर. (ESR- Erythrcyte Sedimentation Rate) ३) अँटीस्ट्रेप्टोकोकल अँटिबॉडी टायटर (Anti- Streptococcal Antibody Titre)- ही सर्वात महत्त्वाची तपासणी आहे. स्ट्रेप्टोकोकल जंतूच्या संसर्गामुळे शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या संस्थेतून ह्य अँटिबॉडीस् तयार होतात. त्याचे प्रमाण २०० युनिटपेक्षा जास्त असणे म्हणजे संसर्ग झाला असे समजण्यात येते. तसेच घशातील थुंकीची तपासणी केली जाते. त्यात नेमके तेच जंतू आहेत की नाही याची खात्री करण्यात येते.
या सर्व तपासण्या नंतर बिटा स्ट्रेप्ट्रोकोकल जंतूने संसर्ग झाला आहे असे निदान केले जाते. हृदयाची सूज ही एउॅ आणि एकोकार्डिओग्राफीच्या तपासणीद्वारे समजते. हृदयाची हालचाल, पंपिंगचे प्रमाण हृदयाच्या आवरणात पाणी जमा होणे (पेरीकार्डिअम इफ्यूजन) झडपांचे आंकुचन पावणे किंवा लीक होणे, गळती होणे ह्यसारख्या गोष्टी एकोकार्डिओग्राफीमधून सहज कळतात. ऱ्हुमॅटिक फीवरचे निदान झाल्यानंतर जर त्वरित उपचार केले तर आलेला संधिवात ताप नाहीसा होतो. पण जर दिरंगाई केल्यास संधिवात पुन्हा पुन्हा होतो. तसेच जर योग्य उपचार केले नाहीत तर हृदयाचे मोठे नुकसान होऊ शकते. हृदयातील मायट्रल आणि अ‍ॅऑटिक झडपा निकामी होऊन रक्तप्रवाह मागे फिरतो. गळकी लागते, त्यामुळे हृदयाची साइज वाढते आणि पंपिंग कमी होते. हृदयाच्या स्नायूंनापण इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते.
म्हणून ऱ्हुमॅटिक फीवरचे लवकर निदान करून लवकरात लवकर उपचार करणे अत्यावश्यक आहे. पण हल्ली ह्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. अस्वच्छ वस्त्या, गलिच्छ राहणी. अशुद्ध- अपुरी हवा, माणसांची गर्दी त्यातून होणारा संसर्ग, मध्यम वर्ग आणि गरीब लोक एकाच खोलीमध्ये दाटीवाटीने राहतात. श्वासाच्या मार्गाने हे जंतुसंसर्ग पसरवितात.
लहान मुलेच (५ ते १८ वयोगटापर्यंत) या आजाराची अनेक वेळा शिकार होतात. शाळेमध्ये या जंतूंचा संसर्ग पसरतो. हा आजार पुन्हा होतो. घसा दुखणे, सांधे सुजणे, ताप येणे. मग हृदयाच्या झडपा आणि स्नायू खराब होऊ लागतात.
कालांतराने जेव्हा हृदयाच्या झडपा खराब होतात तेव्हा रुग्णास छातीत धडधडणे, हृदयाची गती वाढणे, चालल्यानंतर दम लागणे यांसारखी लक्षणे दिसतात. तपासणी केल्यानंतर वाढलेले नाडीचे ठोके, घटलेले वजन, पायांवर सूज व हृदयाच्या ठोक्याबरोबर आढळणारे आवाज (घरघर- Heart Murmur) आढळून येतात. हा आजार आनुवंशिक नाही. पण आई- वडील,, मुले एकाच घरात एकाच वातावरणात राहात असल्यामुळे अनेकांना संसर्ग होऊन घशाचे विकार उद्भवतात. राहत असलेली वसती किंवा परिस्थिती त्याला कारणीभूत असू शकते. त्यामुळे घसा दुखू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी घरातल्या सर्व लहान मुलांची (घशाची) तपासणी करणे हितावह आहे.
हा आजार फसवा आहे. गाठी आपोआप नाहीशा होणे. ताप उतरणे, सांधेदुखी कमी होणे, घसा ठीक होणे झाले की, बहुतेकांची समजूत होते की आता आजार बरा झाला. मग ते उपचार बंद करतात. वरवरची लक्षणे कमी होतात, पण हृदयाच्या झडपा निकामी होण्याचे काम गुपचूपपणे चालू राहते. म्हणून ह्य आजाराबद्दल म्हटले जाते की ‘‘हा आजार सांध्यांना फक्त चाटून जातो, पण हृदयाच्या झडपांचे मात्र लचके तोडतो.’’ (Rheumatic Fever Licks the joints But it bites the heart)
म्हणून ह्य तापाचं निदान झाल्यावर योग्य उपचार वेळेवर होणे गरजेचे आहे. हृदयावरचे दुष्परिणाम नीट लक्षपूर्वक तपासले नाहीत तर सुरुवातीस सहज नजरेतून, तपासणीतून सुटतात. प्राथमिक अवस्थेत उपचार केले तरच हृदयाची होणारी हानी टाळता येते.
प्रत्येक वेळेला घसा सुजला की हृदयविकार होतोच असे नाही. घसा दुखण्याची सुजण्याची इतर बरीच अनेक कारणे आहेत. ‘‘बिटा स्ट्रेप्टोकोकस हिमोलाटिक्स’’ हा जंतू प्रत्येक वेळी घसा दुखला की हृदयाला इजा करेलच असेही नाही. तीन ते पाच टक्केच वेळा हा जंतू हृदयाला इजा करू शकतो.
या आजाराचे निदान झाल्यावर तीन प्रकारची औषधे वापरली जातात. त्याचा वापर रुग्णाच्या लक्षणावरून व तपासण्यावरून ठरवला जातो.
१) प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स- Anitbiotics)
२) सूज कमी करणारी औषधे (अँटिइन्फ्लेमेटरी Agents)
३) स्टिरॉइडस् (steroids)
पहिली औषधे प्रतिजैविक (Antibiotics) या गटातील असतात. घशाची सूज कोणत्या जीवाणूमुळे झाली आहे हे तपासणे आवश्यक असते, पण ते खर्चीक आणि वेळकाढू असते. प्रत्येक वेळी ते निदान होईलच असेही नाही.  म्हणून पेनिसिलीन किंवा एरिथ्रोमायसिन, अ‍ॅम्पिसिलीन यांसारख्या प्रतिजैविकांचा वापर पाच ते सात दिवसांकरता केला जातो. दुसऱ्या टप्प्यातले प्रतिबंधक उपाय म्हणजे ताप पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून करायचे उपाय.
ताप एकदाच येऊन गेला तर हृदयाचा धोका कमी संभवतो, म्हणून पहिल्यांदा ताप येऊन गेल्यावर तीन आठवडय़ांतून एकदा पेनिसिलीनचे इंजेक्शन कमीतकमी पाच वर्षांपर्यंत किंवा जर संधिवात किंवा हृदयाला इजा असेल तर वयाच्या ३५ वर्षांपर्यंत पेनिसिलीनचा वापर दर तीन आठवडय़ांनी करणे आवश्यक आहे.
ऱ्हुमॅटिक फीवरसाठी दुसरे औषध म्हणजे अ‍ॅस्पिरीनचा वापर! ज्या पेशंटला संधिवात होऊन सूज येते किंवा हृदयाला.. झडपांना सूज येते तेव्हा रुग्णाच्या वजनाच्या प्रमाणात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अ‍ॅस्पिरीनचा वापर केला जातो. त्यामुळे सांध्यांची सूज व दुखणे कमी होते. हृदयाचीपण सूज कमी होण्यात मदत होते. झडपांना इजा कमी होते.
जेव्हा हृदयाला किंवा झडपांना सूज येते तेव्हा स्टिरॉइडस् या औषधांचा वापर करणे, हे आवश्यक असते. जर फक्त संधिवात असेल तर  ‘अ‍ॅस्पिरीन’ पूर्ण मात्रेत व ४ ते ८ आठवडय़ांकरिता द्यावे. जर हृदयाला, झडपांना सूज असेल तर स्टिरॉइडस् ४ ते ८ आठवडय़ाकरिता पूर्ण मात्रेत द्यावे व नंतर ते कमी करताना अ‍ॅस्पिरीन २ ते ४ आठवडय़ांकरता देणे योग्य आहे. पण हे सर्व औषधोपचार डॉक्टर किंवा हृदयरोगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
पेनिसिलीन इंजेक्शन संधिवाताच्या या आजारात नियमित न घेतल्यास पुन्हा संधिवात होऊन हृदयात दोष निर्माण होतो. असलेल्या दोषांमध्ये वाढ होण्याची शक्यताच वाढते. झडपांची गळती वाढणे किंवा झडप आकुंचन पावणे यासारखे हृदयाचे विकार होतात.
पेनिसिलीन इंजेक्शन देताना त्यांची रिअ‍ॅक्शन तर येत नाही ना, हे बघणे महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन द्यायच्या आधी सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे. जर टेस्ट नॉर्मल असेल, तरच पेनिसिलीनचे इंजेक्शन द्यावे. प्रत्येकी तीन आठवडय़ांच्या नंतर हे इंजेक्शन देणे आणि प्रत्येक इंजेक्शनच्या आधी ही सेन्सिटिव्हिटी टेस्ट  करणे आवश्यक असते.
या आजारात हृदयातील मायट्रल व्हॉल्व्ह (झडप) मुख्यत: खराब होऊन आकुंचन पावते. झडपा जाड होऊन त्या पूर्णपणे उघडत नाहीत. रक्तप्रवाह आकुंचित झालेल्या झडपेतून कमी होतो. जर झडप खूपच आकुंचित झाली असेल तर अ‍ॅन्जिओप्लास्टी प्रमाणे
बलून (फुगा) च्या साहाय्याने चिरफाड न करता ती झडप उघडता येते. याला बलून मायट्रल व्हाल्व्होटॉमी म्हणजेच ‘फुग्याने झडप उघडणे’ असे म्हणतात.
ऱ्हुमॅटिक फीवर हा गंभीर आजार आहे. तो टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. स्वच्छता राखावी, गर्दी टाळावी. खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा. घसा दुखू लागला की दुर्लक्ष न करता डॉक्टरला त्वरित दाखवावे. घशाची, दातांची, हिरडय़ांची निगा ठेवावी. दात घासताना गरम पाणी, मीठ व जंतुनाशक औषधाच्या मिश्रणाने गुळण्या करण्याची सवय करावी.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:01 am

Web Title: understanding rheumatic fever
Next Stories
1 हृदयरोग आणि गरोदरपणा
2 आहार सवयी आणि हृदयविकार
3 आहार आणि हृदयविकार – २
Just Now!
X