१७ फेब्रुवारीपासून गांधीनगर येथे १३ व्या परिषदेचे आयोजन

नागपूर : वन्यप्राण्यांच्या स्थलांतरित प्रजाती संवर्धनासाठीच्या  यादीत संकटग्रस्त आशियाई हत्ती, माळढोक आणि बंगाल फ्लोरिकन पक्षी यांचा समावेश करण्यासाठी भारत प्रस्ताव सादर करणार आहे. स्थलांतरित प्रजाती संवर्धनाची तेरावी परिषद १७ फेब्रुवारीपासून गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारत हा प्रस्ताव सादर करणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाच्यावतीने गुजरातमधील जामनगर येथे आयोजित तेराव्या परिषदेचे सहआयोजक गुजरात सरकार आहे. दर तीन वर्षांनी ही परिषद आयोजित केली जाते. तेराव्या परिषदेत जगभरातील १२६ देशांमधील पर्यावरणवादी आणि वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. संकटग्रस्त प्रवासी प्रजाती वाचवण्याच्या धोरणावर या परिषदेत चर्चा होणार आहे. या पाच दिवसीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत भारताकडून आशियाई हत्ती, माळढोक आणि बंगाल फ्लोरिकनचा या यादीत समावेश करण्यात यावा म्हणून मागणी केली जाणार आहे. वन्यप्राणी स्थलांतर प्रजाती संवर्धन हा एक करार आहे आणि तो संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत चालवला जातो. वन्यप्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातींच्या यादीनुसार लुप्त झालेल्या  प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या यादीत कोणत्याही प्रजातीचा समावेश करण्यासाठी कोणताही देश प्रस्ताव देऊ शकतो. त्यानंतर परिषदेत यावर चर्चा केली जाते. चर्चेनंतर सदस्य असणारे देश निर्णय घेतात. त्या अनुषंगानेच भारताकडून आशियाई हत्ती, माळढोक आणि बंगाल फ्लोरिकनचा या यादीत समावेश करण्यात यावा म्हणून मागणी केली जाणार आहे. स्थलांतरित प्रजाती संवर्धन कार्यक्रमाचा भारत १९८३ पासून एक भाग आहे. या परिषदेत हिमालयन लँडस्केपमधील चिता, गिधाडे, स्थलांतरित पक्ष्यांसह इतर प्राण्यांच्या संवर्धनावर आणि वन्यजीवांच्या अवैध व्यापारावर तसेच स्थलांतरित प्रजातींच्या अवैध व्यापारावर चर्चा होणार आहे.

माळढोक हा सर्वाधिक उडणारा पक्षी असून २०१८ मध्ये त्यांची संख्या केवळ १५०च्या आसपास होती. आशियाई हत्ती दक्षिणपूर्व आशिया आणि भारतीय उपखंडात आढळतो. १९८६ पासून त्यांची संख्या कमी होत असून गेल्या तीन पिढय़ांमध्ये ही संख्या सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. बंगाल फ्लोरिकन हा पक्षी भारतीय उपखंड, कम्बोडिया आणि व्हिएतनाम येथील आहे. २०१७ पर्यंत या प्रजातीचे एक हजारापेक्षाही कमी पक्षी राहिले आहेत.