शारजहाँहून आणलेले २५ लाखांचे सोने जप्त

नागपूर : तुम्ही सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्कीट ऐकले असेल, परंतु थूटपेस्टसारखी सोन्याची पेस्ट कधी ऐकली आहे का? परंतु खास तस्करीसाठी पॉलिमर आणि प्लॅस्टिसायजरचा वापर करून अशी पेस्ट तयार करण्यात आली. ही पेस्ट शारजहाँहून सुखरूप नागपुरात पोहोचली. पण, नागपूर विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीच्या या नवीन प्रकाराचा भंडाफोड केला.

याप्रकरणी ठाणे आणि तिरुनेलवेली (तामिळनाडू) येथील दोन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल २५.३ लाख रुपये किमतीचे ८३५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोन्याची तस्कारी रोखण्यासाठी विमानतळावर सीमा शुल्क विभागाचे अधिकारी सतर्क असतात. घन स्वरूपापातील लपवलेले सोने शोधण्यात अडचण येत नाही. मात्र, पेस्ट स्वरूपापातील सोन्याची तस्करी कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे.  तरीही ठाणे आणि तिरुनेलवेली येथील दोघांनी हा पर्याय अवलंबला. ते एअर अरेबियाच्या विमानाने शारजहाँ येथून मंगळवारी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी नागपुरात उतरले. ते लगेच सकाळी मुंबईला जाणार होते. त्यामुळे संशय बळावला होता. त्यापैकी एकाची तपासणी केली गेली. त्यांच्या चौकशीतून विमानतळाबाहेर नागपूर ते मुंबई तिकीट घेऊन एक जण प्रतीक्षा करीत असल्याचे समजले. त्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा जवान बाहेर आले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, परंतु पहाटे पाचच्या सुमारास विमानतळावर फारसी वर्दळ नसल्याने त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे नागपूर ते मुंबईची दोन तिकिटे आढळली. दुसरे तिकीट कोणाचे म्हणून शोध घेण्यात आला. तो देशांर्तगत टर्मिनलवर होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. न्याय दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांची स्कॅनरने झडती घेण्यात आली. एकाच्या शरीरात ४५५ ग्रॅम सोने (किंमत १३.२ लाख रुपये) आणि दुसऱ्याच्या शरीरात ३८० ग्रॅम सोने (किंमत १२.१ लाख रुपये) आढळून आले. विमानतळाबाहेर असलेली तिसरी व्यक्ती नागपूरची होती. त्यांच्याकडे नागपूर-मुंबई तिकिटाची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.  या तिघांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गेल्या महिन्यात नागपूर विमानतळावर अशाचप्रकारे दोन कारवाया करण्यात आल्या. २६ एप्रिलला ११ लाख ५० हजार रुपये किंमतीचे आणि २८ एप्रिलला ९ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे सोने जप्त केले होते. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.