जिल्ह्य़ातील मृत्यूसंख्या ८५ वर

नागपूर : उपराजधानीतील विविध खासगी रुग्णालयांत २४ तासांत म्युकरमायकोसिसमुळे (काळी बुरशी) ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या या आजाराच्या मृत्यूची संख्या ८५ रुग्णांवर पोहचली आहे.

नागपुरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत एकीकडे या आजारावर आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा असताना दुसरीकडे हे रुग्ण वाढतच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून इंजेक्शनचे शासकीय व खासगी रुग्णालयांना वितरण केले जात आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयांत ८, खासगी रुग्णालयांत १८ असे एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुर जिल्ह्य़ातील या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १३२ रुग्णांवर पोहचली. तर खासगी रुग्णालयांतील तीन मृत्यूमुळे येथे या आजाराचे मृत्यूही वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांतील ५८५ रुग्णांवर आजपर्यंत शस्त्रक्रिया झाल्या असून ३०० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली आहे. तर सध्या विविध ६४ खासगी व काही शासकीय रुग्णालयांमध्ये ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ३३७ रुग्ण शासकीय रुग्णालयांत तर २८१ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.