अवघ्या ९ टक्के प्रजाती भारतात; वाढत्या शिकारीकडे वनखात्याचे दुर्लक्ष

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरणांची संख्याच भारतात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे भारताव्यतिरिक्त इतर देशांत हरणांच्या वाढत्या संख्येमुळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. एकेकाळी हरणांच्या सर्वाधिक प्रजाती असणारा भारत सद्यस्थितीत याबाबतीत पिछाडीवर आहे. जगातील एकूण हरणांपैकी अवघ्या ९ टक्के प्रजाती भारतात, तर उर्वरित सुमारे १८० जाती आफ्रिका, युरोप, उत्तर-मध्य, दक्षिण अमेरिका व दक्षिण आशियातील काही देशांत अस्तित्वात आहेत.

वाघांच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आणि किंमतही असल्याने वाघांच्या शिकारी होतात. या शिकारींकडे सर्वाचे लक्ष्य केंद्रित असताना हरणासारख्या प्राण्याच्या शिकारीकडे मात्र वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. हरणांच्या शिंगांचा उपयोग आकर्षक फर्निचर, लॅम्पशेड्स तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांच्याही शिकारी केल्या जातात. त्याचवेळी एक किलो कस्तुरी मिळवण्यासाठी शेकडो कस्तुरी मृगांची हत्या केली जाते, हेही हरणांची संख्या कमी होण्यामागील एक कारण आहे. चीनमध्ये हरणाला न मारता कस्तुरी कशी मिळवता येईल, यााबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाघांबाबतीत जेवढा अभ्यास केला जातो तेवढा हरणासारख्या प्राण्यांच्या बाबतीत केला जात नसल्याने त्याची संख्या कमी होण्यामागे  नेमकी कोणती कारणे आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अगदी अलीकडच्या काळापर्यंत भारत हरणांच्या संख्येबाबत अग्रक्रमावर होता, पण आता तशी स्थिती राहिलेली नाही.

भारताची नैसर्गिक साधनसंपत्ती, वनक्षेत्र उत्तम आहे. संशोधकांसाठी आणि संशोधनासाठी अनुकूल वातावरण असताना केवळ इच्छाशक्तीअभावी त्यावर संशोधन होत नाही किंवा हरणांची संख्या कमी होण्यामागील कारणांचा मागोवा घेतला जात नाही. हरीण प्रजातीतील काळविटही अतिशय कमी संख्येत उरलेला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडसारख्या देशात कधीकाळी एकही हरीण नव्हते. आता न्यूझीलंडमध्ये ६ लाखांवर हरणे आहेत. तेथे जागतिक दर्जाचे संशोधनही सुरू आहे.

भारतातील हरणे नेऊन या देशांनी हरणांचे बंदिस्त प्रजनन (कॅप्टीव्ह ब्रिडिंग) करून त्यांची संख्या वाढवली  निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) या संस्थेच्या पाहणीनुसार आजच्या स्थितीत जगातील हरणांच्या १९ जाती धोक्यात आहेत.