शहरातील पहिलाच उच्चांक; भीतिदायक वातावरणात आनंददायी बातमी

नागपूर : शहरात सातत्याने करोनाबाधित वाढत असतानाच आज गुरुवारी मेडिकल, मेयो आणि एम्स या तिन्ही रुग्णालयांतील तब्बल ७७ जण करोनामुक्त झाले. एकाच दिवशी बरे झालेल्यांचा पहिलाच हा उच्चांक आहे.

यामध्ये मेडिकलमधील ४७ आणि मेयोतील ३० जणांचा समावेश आहे. एम्समधूनही १ जण करोनामुक्त झाला. या सगळ्यांना मेडिकलच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून  निरोप दिला. सगळ्यांनी हात जोडून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मेयोतूनही तब्बल ३० जणांना करोनामुक्त झाल्याने सुट्टी दिली गेली.

दरम्यान, जिल्ह्य़ात दिवसभरात नवीन आढळलेल्या एकूण ३३ रुग्णांमध्ये १ गणेशपेठ, १ लष्करीबाग, ८ चंद्रमणीनगर, ३ छत्रपतीनगर, ३ आठवा मैल, २ काटोल, ८ अमर नगरसह इतरही भागातील काही रुग्णांचा समावेश आहे.  शहरातील खासगी प्रयोगशाळेतूनही गुरुवारी दिवसभरात ३ जणांना आजाराची बाधा असल्याचे पुढे आले. नवीन बाधितांपैकी बहुतांश रुग्ण विलगीकरणात  आहेत.

करोनामुक्तांचे प्रमाण ६७ टक्के

उपराजधानीत आजपर्यंत तब्बल १,१४२ करोनाबाधित  आढळले आहेत. यापैकी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दगावलेल्यांमध्ये ५ जण नागपूर जिल्ह्य़ाबाहेरचे आहेत. मेडिकल, मेयो, एम्स रुग्णालयातून करोनामुक्त होऊन ७७२ जण घरी परतले आहेत. नागपूर जिल्ह्य़ात आजपर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ६७ टक्के असून राज्याच्या तुलनेत ही संख्या उत्तम आहे.

चंद्रमणीनगरात धोका वाढला

चंद्रमणीनगरात आता बाधितांची संख्या वाढत असून गुरुवारी तब्बल ८ नवीन रुग्ण या भागातील असल्याचे पुढे आले. त्यामुळे हा भाग नवीन हॉटस्पॉट ठरणार काय, अशी चिंता नागरिकांना लागली आहे. येथे आवश्यक काळजी घेतली जात असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे  प्रशासनाचे म्हणणे आहे.