18 January 2019

News Flash

उत्तराखंडनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटय़ांचा मृत्यू

उत्तराखंडनंतर बिबट मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

उत्तराखंडनंतर बिबट मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी असली तरीही बिबटय़ांचे मृत्यू देशभरासाठीच धोक्याची घंटा ठरले आहेत.

उत्तराखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात बिबट अवयवाचा व्यापार मोठय़ा प्रमाणावर आहे. बिबटय़ाच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे, पण त्याचबरोबर रस्ते अपघातात होणारे मृत्यूही तेवढेच चिंताजनक ठरत आहेत. बिबटय़ाच्या मृत्यूसंदर्भातील सरासरीनुसार देशात प्रत्येक दिवशी एक बिबट मृत्युमुखी पडत आहे. महाराष्ट्रात २०१७ या एका वर्षांत तब्बल ८७ बिबट मृत्युमुखी पडले, तर गेल्या दोन महिन्यात १९ बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. यातील नऊ बिबट हे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

प्रामुख्याने हिवाळ्यात बिबटय़ाची शिकार मोठय़ा प्रमाणावर होते. याच काळात बिबटय़ाच्या अवयवाचा व्यापार तेजीत असतो. बिबटय़ाची शिकार आणि त्याच्या अवयवांच्या अवैध व्यापाराचे प्रमाण हे देशभरात जवळजवळ ३८ टक्के आहे, असे भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तसेच नागझिरासारख्या घनदाट अभयारण्यात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ाची शिकार होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातसुद्धा बिबटय़ाच्या शिकारीची शक्यता नाकारता येत नाही. बिबटय़ाच्या शिकारीसाठी कित्येकदा विषप्रयोग करण्यात येतो. मानवी वस्तीजवळ राहणारा प्राणी असल्याने गावकऱ्यांची जनावरे त्यांचे भक्ष्य बनतात. अशावेळी जनावरांना वाचवण्यासाठी गावालगतच्या पाणवठय़ावर किंवा मृत जनावरावर विष टाकले जाते.

रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण मोठे

भ्रमणमार्ग हे देखील बिबटय़ाच्या मृत्यूमागचे कारण ठरले आहे. दोन जंगलांना जोडणाऱ्या रस्त्यावरून आणि प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावतात. अशावेळी रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून बिबटय़ाचा मृत्यू होतो. अंधार पडल्यानंतर वन्यजीवांच्या हालचालींना वेग येतो. तसेच रात्रीच्यावेळी वाहनेही भरधाव वेगाने जातात. नागपूर-अमरावती मार्गावरील बिबटय़ाच्या मृत्यूमागे नेमके हेच कारण आहे. नाशिक परिसरात देखील मोठय़ा प्रमाणात बिबट अपघातात मृत्युमुखी पडत आहेत.

First Published on April 15, 2018 4:06 am

Web Title: after uttarakhand most of the leopards die in maharashtra