पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण शहर भयभीत झाले असून सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. या लाटेची होरपळ अद्याप थांबली नसतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त के ला आहे. ही लाट नागपूरसाठी अधिक धोकादायक ठरणार, अशी, शक्यता वर्तवण्यात आल्याने पालकमंत्री नितीन राऊत यांनी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले तसेच यासंदर्भात कृती आराखडा सादर करा, अशा सूचनाही केल्या.
तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रसासनाने काय तयारी करायला हवी यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकर पूर्ण करताना जिल्ह्यत २५ ऑक्सिजन पीएसए उभारण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
करोना केअर केंद्रांबाबत नियमावली जाहीर
शहरात मंगल कार्यालयासह, शाळा व हॉटेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या करोना काळजी केंद्रामध्ये प्रशासनाच्या आदेशानुसार शुल्क घेण्याबाबत निर्देश महापालिकेने दिले आहेत. याबाबत महापालिकेने आदेश जाहीर केले असून ज्या करोना काळजी केंद्रातून जास्त शुल्क घेण्याबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. आयुक्तांनी शनिवारी करोना केअर केंद्राबाबत नियमावली जाहीर केली. शहरातील विविध भागातील हॉटेल्स व मंगल कार्यालयात दिवसाला १५ ते २० हजार शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात महापौरांनी आयुक्तांशी चर्चा केली. करोना केअर केंद्रात चार हजार रुपये शुल्क आकारावे, शिवाय काळजी केंद्रात प्राणवायूसह अन्य वैद्यकीय सुविधा असणे बंधनकारक आहे. डॉक्टरचे शुल्क, प्राणवायू, परिचारिका, खाट या संदर्भातील शुल्क हे शासकीय दरानुसार घेण्यात यावे असे निर्देश आदेशात देण्यात आले आहे. याशिवाय मुखपट्टी, सामाजिक अंतर आणि निर्जुतीकरणाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांची प्रकृती बघून त्यांना केअर केंद्रात ठेवण्यात यावे आणि प्रकृती चांगली असेल त्यांना सुटी देण्यात यावी, असेही या आदेशात नमूद आहे.
उपचारसंहिता न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई
रेमडेसिविरसह अन्य काही औषधांचा अतिरेकी वापर केल्यामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे उपचारसंहिता न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकाऱ्यांची टीम गावांच्या भेटीवर जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तथापि, त्या गावातील आरोग्य सुविधा व पायाभूत सुविधांकडे देखील लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना जिल्ह्यच्या सीमा बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले. अमितेश कुमार यांनी पोलिसांनी अँन्टीजन केलेल्या रिकामटेकडय़ांना १४ दिवस सोडू नका, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यांना केले. तसेच येत्या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलिस सक्त कारवाई करतील असे स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्र्यांनी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांंनी रमजानच्या काळात घरातच सण साजरा करावे, असे आवाहन केले.
तिसऱ्या लाटेसाठी नियोजन
- मानकापूर येथे ९०० खाटांचे इस्पितळ
- जिल्ह्यत २५ प्राणवायू प्रकल्पांचे नियोजन
- जिल्ह्यत दहा ठिकाणी क्रायोजनिक प्राणवायू प्रकल्प
- दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट
- १ हजार प्राणवायू यंत्र खरेदी करणार
- प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर
- आंबेडकर रुग्णालय, ईएसआयसी, हज हाऊसचे श्रेणी वर्धन