देवेश गोंडाणे

दोनशे रुपयांच्या प्रमाणपत्रासाठी दोन हजारांची मागणी; कर्मचाऱ्यांच्या सहभागाचेही संकेत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये सध्या ‘दलालराज’ सुरू आहे. अतिरिक्त पैसे घेऊन आवश्यक कागदपत्रे त्वरित तयार करून देणारी टोळी येथे सक्रिय झाली असून यात विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे वृत्त आहे. हे दलाल दोनशे रुपयांचे शुल्क भरून तयार होणाऱ्या प्रमाणपत्रासाठी चक्क दोन हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे काही पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठासह विविध महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल काही कारणांनी रखडलेले असतात. अनेकांच्या नावात किंवा विषयात बदल झालेला असल्याने त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुधारित कागदपत्रे, गुणपत्रिका, प्रमाणपत्र तयार करायची असतात. त्यामुळे रोज अनेक विद्यार्थी परीक्षा विभागाच्या पायऱ्या झिजवत असतात. त्यातच अनेक विद्यार्थ्यांचा विद्यापीठ किंवा राज्य बदललेले असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र तयार करावे लागते. ही सर्व प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारत असते. त्यानंतर विद्यार्थ्यांना आठ ते दहा दिवसांचा अवधी देऊन प्रमाणपत्र मिळेल असे सांगण्यात येते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र लवकर मिळवण्याची घाई असते. याचा फायदा हे दलाल घेत आहेत. परीक्षा विभागात येणाऱ्या अशा गरजू विद्यार्थ्यांना गाठून त्यांच्याकडून दोनशे रुपयात तयार होणाऱ्या कागदपत्रासाठी दोन हजारांची मागणी केली जात आहे. काहींना प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाच माहिती नसल्याने असे विद्यार्थीही या दलालांच्या गळाला सहज अडकत आहेत. त्याचा फायदा घेत दलाल विद्यार्थ्यांना अक्षरश: लुटत आहेत.

प्रवेश प्रक्रियेच्या अनेक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालक आधीच त्रस्त असतात. त्यातच दलालांकडून अशी लूट होत असल्याने पालकांचा मन:स्ताप वाढला आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी परीक्षा नियंत्रक अनिल हिरेखण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

असे आहेत दर

* पात्रता प्रमाणपत्र –   २५००

* नावात बदल करणे –   १०००

* दुहेरी प्रत गुणपत्रिका –  २०००

* अडकलेला निकाल जाहीर – १५००