नागपूर-पुणे क्लोन ट्रेनला रेल्वे बोर्डाची प्रतीक्षा

दिवाळीच्या दिवसात नागपूर-पुणे मार्गावरील गाडय़ांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने या मार्गावर ‘क्लोन ट्रेन’ चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. परंतु रेल्वे डबे उपलब्ध होत नसल्याने दिवाळी जवळ आली असताना रेल्वे बोर्डाकडून ‘क्लोन ट्रेन’ला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या अर्थसंकल्पात ‘क्लोन ट्रेन’ सुरू करण्याची घोषणा केली होती. ज्या रेल्वे मार्गावरील गाडय़ांना प्रवाशांची सातत्याने खूप मोठी प्रतीक्षा यादी असते, त्या मार्गावर नियमित गाडी सुटल्यानंतर एक तासाच्या आत त्या गाडीच्या मागे दुसरी गाडी सोडण्यात यावी, अशी ‘क्लोन ट्रेन’ची संकल्पना आहे.

विदर्भातील मोठय़ा संख्येने युवक-युवती शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाकरिता पुण्याला आहेत. यामुळे नागपूर-पुणे रेल्वेगाडय़ांना कायम गर्दी असते. विशेषत:  दिवाळीत आणि उन्हाळ्याच्या सुटय़ात या मार्गावर रेल्वेगाडीचे निश्चित मिळणे फारच कठीण असते. यामुळे नाईलाजाने प्रवाशांना खासगी बसने प्रवास करावा लागतो. या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने नियमित बसला देखील प्रचंड गर्दी होते.

त्याचा लाभ घेत खासगी वाहतूकदार बसभाडे चार ते पाचपटीने वाढवून प्रवाशांची लूट करतात. या काळात विमानभाडे देखील आकाशाला भिडलेले असतात. दरवर्षी या मार्गावरील ही स्थिती असल्याने प्रवाशांना काही दिलासा देण्यासाठी विशेष गाडय़ा सोडण्यात येतात. परंतु विशेष गाडय़ांच्या वेळा गैरसोयीच्या असतात. शिवाय विशेष गाडीला चालवण्याला दुय्यम प्राधान्य दिले जाते. तसेच गाडय़ा काही दिवसांपूर्वी घोषित केल्या जात नसल्याने प्रवाशांना नियोजन करण्यास वेळ मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करून नागपूर ते पुणे या मार्गावर आणखी रेल्वेगाडय़ा चालवण्याची मागणी सातत्याने होत असते. त्याच आधारावर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर-पुणे मार्गावर ‘क्लोन ट्रेन’ चालवण्याचा प्रस्ताव मुख्यालयामार्फत रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. दिवाळीत ‘नागपूर-पुणे क्लोन ट्रेन’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. दिवाळीसाठी रेल्वेगाडय़ा फूल्ल झाल्या आहेत. परंतु रेल्वे बोर्डाने या ‘क्लोन ट्रेन’ला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात आणि नोव्हेंबर पहिल्या आठवडय़ात नागपूर ते पुणे मार्गावरील गाडय़ांना लांबलचक प्रतीक्षा यादी आहे. या काळात या मार्गावर सहाशे ते सातशेच्या घरात प्रतीक्षा यादी पोहचली आहे.

या बाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दिवाळीत नागपूर-पुणे मार्गावर क्लोन ट्रेन चालविण्यासारखी स्थिती आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे नागपूर विभाग प्रयत्नशील आहे. या संदर्भातील निर्णय उच्च पातळीवर घेतले जातात.

‘क्लोन ट्रेन’

प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि मोठी प्रतीक्षा यादी असलेली रेल्वे गाडी सुटल्यानंतर तासभरात दुसरी गाडी सोडण्यात येईल. ही नवीन गाडी असेल आणि या गाडीचे भाडे नियमित धावणाऱ्या गाडीच्या प्रवासभाडय़ा एवढेच असेल.तीन महिन्यांपासून प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना वेळेत पोहोचता यावे म्हणून ही ‘क्लोन ट्रेन’ सोडण्याचे प्रस्तावित आहे. नियमित गाडीचा ‘रिझव्‍‌र्हेशन चार्ट’ तयार झाल्यावर प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना क्लोन ट्रेनमध्ये ‘बर्थ’ माहिती लघुसंदेशाद्वारे देण्यात येते.