पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तसेच देशभरात गाजावाजा करण्यात आलेल्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाला तीन वर्षे झाली. मोदी यांनी या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याकरिता काँग्रेस दिल्लीत एक दिवसांचे उपोषण करणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०१४ ला यवतमाळ जिल्ह्य़ातील दाभाडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. या चर्चेसाठी देशभरातील आत्महत्याग्रस्त ३३ जिल्ह्य़ांतून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा व कुटुंबीयांना बोलवण्यात आले होते. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे स्वप्न निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी दाखवले होते. यावेळी १९ आश्वासने देण्यात आली होती. सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर त्यापैकी एकाही आश्वासनाची अंमलबजाणी तर झाली नाहीच, शिवाय त्यादृष्टीने पावले देखील टाकण्यात आलेली नाही. सत्तेत आल्यामुळे कदाचित दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असेल. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून मोदींना त्यांच्या आश्वासनांचे स्मरण करून देणार आहे. त्यासाठी १८ मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करण्यात येणार आहे, असे माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले.

यवतमाळ जिल्ह्य़ातील दाभाडी येथे १५०० पेक्षा जास्त ठिकाणाच्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडून मोदींनी केलेल्या ‘चाय पे चर्चा’वर आता ते बोलत देखील नाहीत. या कार्यक्रमात त्यांनी शेतमालाचे भाव ठरवताना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा भाव देण्यात येईल. राष्ट्रीयीकृत बँकेकडून सरसकट शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात कर्ज देण्यात येईल.

जेथे कापूस पिकते तेथेच धागा बनविणे, कापड बनविणे व रेडिमेड कपडे बनवून तेथूनच विदेशात पाठवण्यात येईल. शीतगृह उभारण्यात येतील, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी बँकांकडून अत्यंत कमी दरात कर्ज देण्यात येईल व सरकार स्वत: जमानतदार राहील. भारतातील नदीजोड प्रकल्प पुन्हा हाती घेण्यात येईल, गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाला गेट लावून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४०० कोटी रुपयांची वीज मोफत देण्यात येईल. यासह अनेक आश्वासनांची उधळण केली आणि आपणच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा भास निर्माण केला होता. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना त्यांना मतदान केले, परंतु पंतप्रधान झाले आणि त्यांना आश्वासनांचा विसर पडला.

संवाद यात्रा म्हणजे बकवास

भाजपने विरोधी पक्षात असताना अमूक करू, तमूक करू, असे एक ना शेकडो आश्वासन दिले. सत्तेत आल्यानंतर ते त्यांना पूर्ण करता आले नाही. सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे लोकांचे मूळ मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी, त्यांचे मन वळवण्यासाठी संवाद यात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शिवीगाळ करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. ही यात्रा म्हणजे बकवास आहे, अशा शब्दात मोघे यांनी संवाद यात्रेला लक्ष्य केले.