मनुस्मृतीच्या विचारांमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यातना झाल्या. त्याच मनुस्मृतीच्या विचारांचे रक्षण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) करत असल्याचा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी दशेपासूनच यातना सहन कराव्या लागल्या. मनुच्या विचारांचा त्यांना नेहमी विरोध केला. मनुस्मृतीच्या विचारांमुळेच या देशात दलितांवर अन्याय झाला. संविधानाच्या माध्यमातून काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूच्या विरोधात लढा दिला. पण आजही मनूचा विचार देशात जिवंत आहे. मनूचे विचार कायम रहावेत यासाठी भाजप आणि संघाकडून प्रयत्न सुरू आहेत. रोहित वेमुलाची हत्या ही मनुची विचारसरणी जपणाऱयांकडून झाली. देशात आजही जातीयता कायम आहे आणि त्याचे रक्षण करण्याचे काम भाजप आणि संघाकडून होत आहे. पण संघाच्या विचारधारेसमोर मी कधीच झुकणार नाही आणि कुणालाही झुकू देणार नाही, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले. मनुच्या विचारधारेला मी कधीच बळी पडणार नाही हे भाजप आणि संघाला माहिती असल्यामुळेच माझ्यावर हल्लाबोल केला जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकार पंचायतराज संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप राहुल यांनी केला, तर भाजपकडून आरक्षण संपविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सोनिया म्हणाल्या. भाजप विभाजनाचे राजकारण करत असून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा घणाघात सोनियांनी यावेळी केला.