भाजपचे आदिवासी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

नागपूर : आदिवासी विभागातील खरेदीचे कंत्राट गैरआदिवासींना न देता आदिवासी समाजातील युवकांना देण्यात यावे, अशी मागणी भाजपने आज आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली.

आदिवासी विभागाकडून आदिवासी आश्रम शाळा, मुला-मुलींच्या वसतिगृहात न्याहारी, जेवण आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यासाठी आवश्यक उपकरणे, वस्तू यांचे तसेच कार्यालय स्वच्छतेचे कंत्राट दिले जाते. ही सर्व कामे समाजातील युवकांना किंवा आदिवासी महिला बचत गटांना देण्यात यावे.  राजे बक्त बुलंदशाह यांचा व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पालकत्व आदिवासी विभागाने घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय निवेदनात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामध्ये करोना काळात आदिवासी विकास विभागाने आदिवासी समाजासाठी काय नियोजन केले. त्यांना आरोग्य सोयी, सुविधा किंवा अन्नधान्य वाटप, समाजातील नागरिकांसाठी रोजगार देण्यासाठी काय प्रयत्न झाले. विभागाकडे प्रकल्प स्तरावर रेमडेसिविर इंजेक्शनसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्याचे नियोजन कसे करण्यात आले. २०२०-२१ या सत्रात नामांकित शाळेत प्रवेशाचे काय झाले आणि टाळेबंदीमुळे नंतर नियोजन कसे राहणार आहे, असे विचारण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदास विकास महात्मे, नगरसेवक बाल्या बोरकर उपस्थित होते.