सिरसपेठ, हिवरीनगरमध्येही बाधितांची नोंद, आरोग्य विभागाची चिंता वाढली

नागपूर : उपराजधानीतील सिरसपेठ आणि हिवरीनगर भागात प्रथमच करोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे मोमीनपुरातील एका ५० वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू सोमवारी मेयो रुग्णालयात झाला. तिला रक्ताचा कर्करोग असून  त्यावर उपचार सुरू होते.

उपराजधानीत पूर्वी सतरंजीपुरा परिसरातून मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळत होते. परंतु कालांतराने मोमीनपुरा परिसराने सतरंजीपुराला मागे टाकले. आता शहरातील सर्वाधिक रुग्ण मोमीनपुरा येथेच नोंदवले जात आहेत. सोमवारी येथील एका ५० वर्षीय रक्ताचा कर्क रोग असलेल्या व करोनाबाधित महिलेचा मेयोत उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला रविवारी अत्यवस्थ अवस्थेत नातेवाईकांनी मेयोत दाखल केले होते. तिच्यावर दुसऱ्या रुग्णालयात किमोथेरपी प्रक्रियेतून उपचार सुरू होते.

महिलेला श्वास घ्यायला त्रासासह तापाची लक्षणे असल्याने तिचे नमुने डॉक्टरांनी तपासणीला पाठवले होते. त्यात तिला बाधा असल्याचे निष्पन्न झाले.दुसरीकडे मेयोतील प्रयोगशाळेत एका मोमीनपुरा परिसरातील गर्भवती आणि राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानालाही विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले. हा जवान लकडगंज पोलीस ठाणे कॅम्प परिसरातील आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सुरक्षा देताना त्याला एखाद्या बाधिताच्या संपर्कात आल्याने विषाणूची बाधा झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, शहरातील सिरसपेठ आणि हिवरीनगर परिसरातील प्रत्येक एका व्यक्तीलाही विषाणूची लागण झाली. दोघीही महिला असून त्या मुंबईहून परतल्याचा इतिहास आहे. दोघांनी शहरातील खासगी प्रयोगशाळेत नमुने तपासणीला दिले होते. त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने महापालिकेकडून तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल करत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. खबरदारी म्हणून या सगळ्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांना विलगीकरण केंद्रात घेतले जाणार आहे. सिरसपेठ आणि हिवरीनगर भागांना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवतींनाही करोना

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करोना प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची करोना चाचणी केली जात आहे.  त्याअंतर्गत बऱ्याच गर्भवतींना विषाणूची बाधा झाली असल्याचे पुढे आले. वेळीच त्यांच्यावर उपचारासह प्रसूतीदरम्यान काळजी घेतली जात असल्याने आई- बाळाला सुरक्षित ठेवण्यात डॉक्टरांना यश मिळत आहे. सोमवारी पुन्हा मोमीनपुरातील गर्भवतीला विषाणूची बाधा झाली असल्याचे पुढे आले.

१५ जण करोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुट्टी

मेयो रुग्णालयात यशस्वी उपचाराने करोनामुक्त झाल्याने शहरातील मोमीनपुरा परिसरातील १५ जणांना सोमवारी सुट्टी दिली गेली. त्यात दोन मुलांचा समावेश होता. ऐन ईदच्या दिवशी सगळे करोनामुक्त झाल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद होता. मेयोतील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून सगळ्यांना आनंदाने निरोप दिला. पुढे १४ दिवस सगळ्यांना घरात विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला गेला. तर करोनामुक्त झालेल्यांनी डॉक्टरांचे आभार मानत सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.