शफी पठाण

साहित्य संमेलनाचे आयोजन हे आज फारच आव्हानात्मक  झाले आहे. ज्या शहरात असे संमेलन आयोजित करायचे असेल तिथे वाङ्मयीन प्रतिसाद कसा मिळेल हे न बघता आधी चांगली हॉटेल्स आहेत की नाही, हे शोधावे लागते. कारण, संमेलनकाळात साहित्यिकांसाठी दर्जेदार हॉटेल ही ‘जीवनावश्यक’ वस्तू होऊन जाते, अशी खास शालजोडीतील टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे.

महामंडळाचे ‘अक्षरयात्रा’ हे मुखपत्र डिजिटल  स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात ठाले पाटील यांनी उस्मानाबादच्या संमेलनाचा संदर्भ देत ब्राम्हण महासंघाचाही खरपूस समाचार घेतला आहे.

‘अक्षरयात्रा’च्या प्रदीर्घ ‘अध्यक्षीय’मध्ये ठाले पाटील यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. पण, यातला एकही विषय असा नाही जो टीकेशिवाय पूर्णत्वास गेला असेल. ‘अध्यक्षीय’च्या अगदी सुरुवातीलाच २०२०चे संमेलन उस्मानाबादला कसे मिळाले हे सांगताना ठाले पाटील लिहितात, श्रीमंत, अतिश्रीमंत संमेलनस्थळांचा सोस असलेली मंडळी महामंडळातून आणि त्यांच्या साहित्य संस्थांमधूनही बाहेर पडल्याने हे संमेलन उस्मानाबादला घेता आले. परंतु ती मंडळी नेमकी कोण आहेत, त्यांनी ग्रामीण भागातील संमेलनाला महामंडळाच्या कोणत्या बैठकीत विरोध केला, याबाबत कोणताही खुलासा यात नाही. फादर फ्रासिंस दिब्रिटो यांची उस्मानाबादचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर  ब्राम्हण महासंघाने जो कांगावा केला तो केवळ त्यांना हिंदू अध्यक्ष हवा होता व तो न मिळाल्याने करण्यात आला. महाराष्ट्रातील ब्राम्हणांमधला एक वर्ग कायम धर्माध व जात्यंध राहिला आहे. अखिल मराठी समाजाला एकसंध होण्यापासून रोखण्याचे काम याच गटाने केले. याच गटाने उस्मानाबाद संमेलनाच्यावेळीही आपले उपद्रव्यमूल्य दाखवले. ब्राम्हण महासंघाने आपल्या मेंदूचा विकृत वापर करून आणि  मेंदू गहाण टाकलेल्या बहुजनांना भडकावून हे संमेलन उधळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मला व ब्राम्हण असल्याचे दाखले देत मिलिंद जोशी यांनाही धमक्यांचे फोन करण्यात आले. परंतु विरोधाचे हे नाटक पोकळ ठरले आणि महामंडळाच्या चोख नियोजनामुळे संमेलन प्रचंड यशस्वी झाल्याचे ठाले पाटील यांनी यात विशेष नमूद केले आहे.

‘वृत्तपत्रांनी दबाव बनवला!’

उस्मानाबाद संमेलनाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू असताना वृत्तपत्रांनी काही नावे समोर करून माझ्यावर आणि महामंडळावर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मराठवाडय़ातील अर्धा डझन नावे या  वृत्तपत्रांनी दीडएक महिना चर्चेत ठेवली आणि हा दबाव अजिबात कमी होऊ दिला नाही. याबाबतच्या बातम्या ही वृत्तपत्रे रंगवून व ठासून देत होती,  या शब्दांत  ठाले पाटील  यांनी वर्तमानपत्रांच्या वृत्तांकनाच्या शैलीवरही ‘अक्षरयात्रा’मध्ये  आक्षेप नोंदवला आहे.

छुप्या प्रादेशिकवादाची कबुली

आम्ही अनेक दिवसांपासून उस्मानाबादला संमेलन मागत होतो. परंतु ते मिळत नव्हते. अखेर महामंडळ औरंगाबादकडे आल्यावरच ते शक्य झाले, असे सांगतानाच ठाले पाटील यांनी साहित्य महामंडळातील छुप्या प्रादेशिकवादाची कबुलीही दिली आहे. ज्या घटक संस्थेकडे महामंडळ असते ती संस्था आपल्या परिसरातच संमेलन व्हावे, यासाठी धडपडत असते. संमेलन अखिल भारतीय असूनही तसा व्यापक विचार न करता स्थळ निवडताना आपले प्रादेशिक  हितसंबंध जोपासले जातात, असा जो आरोप सातत्याने होत असतो तो खरा आहे हेच जणू यातून ठाले पाटील यांनी मान्य केले आहे. पुण्यात महामंडळ असताना २०१४ चे संमेलन सासवडला झाले, २०१५ चे घुमानला झाले असले तरी त्याचे संयोजक पुण्याचेच होते. असे असतानाही २०१६ चे संमेलन पुन्हा पुण्यातील पिंपरी चिंचवडलाच घेण्यात आले होते!