उपराजधानीत मृत्यूदर कमी ठेवण्यात डॉक्टरांना यश *  करोनामुक्त घरी पोहचल्याने नातेवाईक सुखावले

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनाबाधिताच्या संपर्कातील व एकही लक्षण नसलेल्या महिलेला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहिला अहवाल नकारात्मक आल्यावरही तिच्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी आढळली. तिचे दुसऱ्यांदा नमुने घेत उपचार सुरू झाले. ती बाधित आढळल्यावरही यशस्वी उपचाराने चोवीस दिवसांनी करोनामुक्त होऊन घरी परतल्यावर नातेवाईक सुखावले. मेयोतही अशा दोन रुग्णांच्या नोंदी असून नागपुरातील यशस्वी उपचार पद्धत मृत्यूदर कमी ठेवण्यात उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे.

सतरंजीपुरातील एका कुटुंबातील पती-पत्नीसह मुलालाही विषाणूने विळख्यात घेतले होते. प्रथम पती व मुलगा बाधित आढळल्यावर महिलेलाही (पत्नी) प्रशासनाने मेडिकलमध्ये दाखल केले. लक्षणे नसतानाच तिचा पहिला अहवाल नकारात्मक आल्यावर ती घरी जाण्याचा आग्रह धरू लागली. दरम्यान, तज्ज्ञ डॉक्टरांनी एकदा तिचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले. त्यात ते धोक्याच्या पातळीत म्हणजे ७४ च्या खाली होते. हे प्रमाण ९४ हून अधिक सामान्य मानले जाते. एवढे कमी प्रमाण बघून येथील डॉक्टरांनी तातडीने वरिष्ठांना सूचना केली. दरम्यान, महिलेच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे  इतर आठ ते नऊ प्रकारच्या तपासणी खासगी प्रयोगशाळेतून करण्यात आल्या. तिची प्रकृती खालवल्याचे व ती काही तासात आणखी अत्यवस्थ होण्याची शक्यता बघता तिला स्टेरॉईडसह इतरही उच्च श्रेणीचे औषधं सुरू करण्यात आले. हळूहळू ती धोक्याच्या बाहेर आली आणि ९ मे रोजी करोनामुक्त झाली.  मेडिकलच्या यशस्वी उपचारात औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. राजेश गोसावी, डॉ. अर्चना अहेर, डॉ. सुशांत मुळे यांची भूमिका महत्त्वाची होती, तर रुग्णासाठी हव्या त्या तपासण्या बाहेर करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी मदत केली.

‘‘महिलेचा अहवाल नकारात्मक आल्यावरही तिच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. या पद्धतीचे रुग्ण काही तासात दगावण्याचाही धोका असल्याने तिच्यावर अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपचाराची दिशा निश्चित केली. ती बाधित आढळल्यावर जास्तच काळजी घेतली जात होती. ती करोनामुक्त होऊन घरी परतली असून मध्य भारतात या पद्धतीचे हे पहिलेच प्रकरण आहे.’’

– डॉ. राजेश गोसावी, विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल, नागपूर.