७० पेक्षा अधिक आबालवृद्धांनी दिवाळी किल्ले साकारले

दिवाळीच्या आनंद पर्वणीत घरोघरी गडाच्या प्रतिकृती साकारण्याची पूर्वी हौस होती. त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे व कलात्मक निर्मितीचे विलोभनीय दर्शन घडत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. परंतु संगणकाच्या काळातही किल्ल्यांचे आकर्षण कायम असून माती, गोटे आणि टाकाऊ वस्तूपासून किल्ले निर्माण केले जात आहेत. शहरातील विविध भागात ७० पेक्षा अधिक आबाल वृद्धांनी शिवकिल्ले आणि काल्पनिक किल्ले तयार केले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये किल्ले तयार करण्याची ओढ वाढावी आणि त्यांना किल्ल्याची माहिती व्हावी, या दृष्टीने नागपुरात शिव किल्ले स्पर्धा घेतली जाते आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने आज शहरातील विविध भागात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आणि कुटुंबांनी शिवकिल्ल्याच्या प्रतिकृती तयार केल्या. दिवाळीच्या दिवसात फराळाचा आस्वाद आणि फटाके फोडण्याचा आनंद घेत असताना तयार करण्यात आलेल्या किल्ले दर्शनासाठी लोक एकमेकांच्या घरी जाऊ लागले आहेत. १९८६ पासून या किल्ले स्पर्धाचे आयोजन करणारे नागपूर हे पहिले शहर असून, त्याला दरवर्षी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षी नागपुरात भरतनगरातील व्यकंटेश राऊत यांनी दहा जलदुर्ग, गोकुळपेठमध्ये दुरुगकर यांनी काल्पनिक किल्ला, शिवाजीनगरातील  अश्विन डिडोळकरांनी शिवनेरी, शास्त्री हायस्कूलमध्ये काल्पनिक, लक्ष्मीनगरातील हळवे यांच्या निवासस्थानी शिवनेरी, विमानतळ परिसरातील रंजना जोशी यांनी देवगिरी, महाल पाताळेश्वरमधील हिमांशू हरदास यांनी सिंधुदुर्ग, पुष्पक दहासहस्त्र यांनी रायगड, शिवगौर प्रतिष्ठान सिंहगड, स्वानंद बोरगावकर यांनी शिवनेरी, मानेवाडा भागातील निमिषा साठे यांनी राजगड बजरंगमधील भूषण उमाठे यांनी नगरधन, मंगेश बारसागडेने विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे.

दिवाळीच्या आधी पंधरा दिवस किल्ला तयार करण्यासाठी मुले काम सुरू करीत असतात. त्यामुळे किल्ले तयार करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो. अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्य त्यात सहभागी होत असतात.

आजपासून किल्ल्यांचे परीक्षण

शिव किल्ले स्पर्धा ही तीन गटात आयोजित करण्यात आली असून उद्या, शनिवारपासून दोन दिवस या शहरातील ७० किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे परीक्षण केले जाणार आहे. मॉडर्न स्कूल येथील तयार करण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी करून स्पर्धेच्या परीक्षणाला प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख उपस्थित राहणार असल्याचे स्पर्धेचे संयोजक रमेश सातपुते यांनी कळवले आहे. तीन गटात ही स्पर्धा असून प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. याव्यतिरिक्त यशस्वी महिला स्पर्धकाला व ज्येष्ठ नागरिकांनाही पुरस्कार देण्यात येईल.