मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी पाच वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम १७४ नुसार लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी देशमुखांविरोधात कारवाईची मागणी ‘ईडी’ने केली आहे.

‘ईडी’ने कारवाईची मागणी केलेल्या कलमांतर्गत एक महिन्यापर्यंतचा साधा कारावास वा ५०० रुपयांचा दंड किंवा दोन्हीच्या शिक्षेची तरतूद आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी नोंदवलेल्या प्रकरणामध्ये आतापर्यंत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुख यांच्या दोन माजी स्वीय सचिवांना अटक केली असून दोघेही सध्या कारागृहात आहेत. ‘ईडी’ने याप्रकरणी नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाही आरोपी दाखवले असले तरी देशमुख वा त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना मात्र आरोपपत्रात आरोपी दाखवण्यात आलेले नाही.

घरी पहाटेपर्यंत कारवाई, कार्यालयावरही छापे

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दुपारी आयकर विभागाने छापा टाकला. शनिवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.  शनिवारी देशमुख अध्यक्ष असलेल्या एनआयटी महाविद्यालयासह रामदासपेठ स्थित मिडास हाईट्सच्या कार्यालयातही प्राप्तिकर विभागाने तपासणी केली.

शुक्रवारी दुपारी पहिल्यांदा आयकर विभागाने देशमुख यांच्या सिव्हील लाईन येथील निवासस्थानी  धाड टाकली. संपूर्ण घराची  झडती घेतली.तसेच देशमुख यांच्या बँकेचे खाते देखील सील केले.  ही कारवाई शनिवारी पहाटेपर्यंत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  घरी आणि देशमुख यांच्या माहूरझरी येथील नागपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयावरही शुक्रवारी आणि शनिवारी देखील धाड टाकण्यात आली. संगणकातील खाते तपासण्यात आले. त्याशिवाय याच महाविद्यालयाच्या रामदासपेठ येथील कार्यालयाची  झडती घेण्यात आली. माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथील ५० आयकर अधिकारी या कारवाईत सहभागी होते.