रेल्वे सुरक्षा दलाने १५ दिवसांपूर्वी पक्ष्यांची तस्करी रोखून त्या पक्ष्यांना वनखात्याच्या ताब्यात दिले. तस्करीतील हे आठही पक्षी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले. मात्र, पत्राचारात अडकलेल्या या पक्ष्यांची रवानगी अजूनपर्यंत त्यांच्या मूळ अधिवासात होऊ शकली नाही.

अधिसूची एकमधील कॉमन हिल मैना या पक्ष्यासह एकूण आठ पक्ष्यांची तस्करी रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. या प्रकरणात तस्कर हाती लागले नाहीत, पण पक्ष्यांची जीव वाचला. ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील या पक्ष्यांची ओळख पटवणे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही कठीण केले आणि पक्षी ओळखण्यासाठी पक्षी अभ्यासकांना बोलवावे लागले. यातील दोन पक्षी प्लम हेडेड पॅरोट व कॉमन हिल मैना हे अधिसूची एकमध्ये येतात. मात्र, कोंबडीसारख्या दिसणाऱ्या पाच पक्ष्यांची ओळख पटवणे या पक्षी अभ्यासकांनाही कठीण केले.

हे पक्षी मेघालय, नागालँडमधील असल्याचा अंदाज त्यांनी दिला. सरपटणारे प्राणी किंवा पक्षी किंवा इतर कोणतेही प्राणी त्यांच्या मूळ अधिवासात सोडले तरच ते जगू शकतात. अन्यथा दुसरीकडील वातावरणात ते जगू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांची ओळख पटल्यानंतर कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. यासंदर्भात उपवनसंरक्षकांनाही पत्र देण्यात आले. तर उपवनसंरक्षकांकडून ते मुख्य वनसंरक्षकांकडे पाठवण्यात येईल आणि त्यांच्याकडून ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पाठविण्यात येईल. या पत्रात पक्ष्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, तब्बल १५ दिवस होऊनही ही प्रक्रिया जागच्या जागीच खोळंबली आहे.

यापूर्वीही रेल्वेच्या सहकार्यामुळेच कासवांची तस्करी उघडकीस आली. त्यावेळी ज्या प्रदेशातले ते कासव होते त्या प्रदेशात त्यांना वेळेत सोडण्यात आले, पण पक्ष्यांना सोडण्याच्या या प्रक्रियेत प्रचंड उशीर केला जात आहे. त्यामुळे या पक्ष्यांना त्यांच्या मूळ अधिवासात कधी सोडले जाणार, याकडे पक्षी निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.