प्राणवायू प्रकल्पांची उभारणी, औषधांची तजवीज

नागपूर : करोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्यावेळी जाणवलेली प्राणवायू, औषधसाठा,  मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीची चणचण संभाव्य तिसऱ्या लाटेच्यावेळी जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून आत्मनिर्भरतेवर भर दिला जात आहे.

सध्या एम्स आणि कोराडी वीज प्रकल्पात प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहे. एमएसएमई विभागाच्या माध्यमातूनही प्राणवायू बँक उभारण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. रेमडेसिविर आणि म्युकरमायकोसिसवरील इन्फोटेरेसिन हे दोन्ही इंजेक्शन वर्धेच्या जेनेटिक लॅबोरेटरीत तयार केली जात आहेत. पाच तारखेला केंद्राकडून राज्याला एकूण ७ हजार ६६२ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले तसेच सहा तारखेला वर्धेच्या कंपनीनेसाडेचार हजार अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन उपलब्ध करून दिले. करोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या गोळ्यांचा (७.२० कोटी) साठा राज्याकडे आहे. कॉन्सट्रेटरचा काळाबाजार रोखण्यासाठी राष्ट्रीय औषध दर नियंत्रण  प्राधिकरणाने (नॅशनल फारमास्युटिकल प्राईस अ‍ॅथॉरिटी) या यंत्राचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासठी राज्याच्या कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातून गरजेइतके मनुष्यबळ तिसऱ्या लाटेच्यावेळी उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मेयो, मेडिकल व एम्ससह इतरही रुग्णालयात लहान मुलांसाठी आतापासूनच वाढीव खांटाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. बुटीबोरी मॅनिफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष व भाजपच्या इकॉनॉमिक आघाडीचे संयोजक मिलिंद कानडे म्हणाले, बाजारात ज्या वस्तू विकतात त्याच उत्पादक तयार करतात. पहिल्या व दुसऱ्या लाटेच्यावेळी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्याचे उत्पादन उत्पादकांनी केले. अनेक गोष्टी आता स्थानिक पातळीवर तयार होत आहेत. जसजशी गरज भासेल ती सामुग्री आता पुढच्या काळात उत्पादित करण्याची क्षमता उत्पादकांमध्ये आहे.