वजन नियंत्रण, चार हजार पावले चाला; मधुमेह तज्ज्ञांचा ‘दिल से’ कार्यक्रमात सल्ला

नागपूर : प्रत्येक व्यक्तीने शरीरयष्टीनुसार चालण्यासह विविध प्रकारचे व्यायाम करण्याची गरज आहे. ही काळजी रोज घेतल्यास हृदयरोगासह इतर आजारांचा धोका कमी करता येतो, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञांचा ‘दिल से’ कार्यक्रमात देण्यात आला. तसेच तज्ज्ञांनी प्रत्येकाने वजन नियंत्रणात ठेवणे व किमान चार हजार पावले दररोज चालल्यास हृदयरोगासह सर्वच आजारापासून बचाव करता येईल, असे मत व्यक्त केले. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी हॉटेल सेंटर पॉईंट येथे हा कार्यक्रम झाला.

त्यापूर्वी झालेल्या समारंभात असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी तर सचिवपदाची सूत्रे डॉ. नितीन वडस्कर यांनी स्वीकारली. समारंभाला नवी दिल्ली येथील डॉ. जे.सी. मोहन, डॉ. अजिझ खान, डॉ. सुनील अंबुलकर, डॉ. शंकर खोब्रागडे उपस्थित होते.

डॉ. मोहन म्हणाले की, ज्याप्रमाणे यकृत, पोटाभोवती चरबी जमा होते, त्याच प्रमाण हृदयाच्या चारही कप्प्यांभोवतीदेखील चरबी जमा होते. त्यामुळे हृदयाची कार्यशक्ती कमी होते. ही कार्यशक्ती कमी होणे म्हणजे हृदय कमकुवत होत जाते.

मधुमेहात ही जोखीम ५० टक्के वाढते. डॉ. खान म्हणाले, प्रदीर्घ काळ मधुमेह असलेल्या २० टक्के रुग्णांना हा त्रास होतो. त्यामळे चार पावले चालल्यानंतरही धाप लागू शकते. मधुमेहात हृदय निकामी होऊन ओढवणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे कर्करोगाने दगावणाऱ्याच्या संख्येपेक्षा मोठे आहे. डॉ. सेनगुप्ता म्हणाले, हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध घालण्यासाठी योग्य वजन राखण्याची गरज आहे. व्यायाम हा दिनचर्येचा अविभाज्य घटक असला पाहिजे. मधुमेह असेल वा नसेल तरीही प्रत्येकाने किमान साडेचार हजार पावले चालले पाहिजेत. प्रदीर्घ काळातल्या मधुमेहामुळे शरीरातल्या सर्व अंतर्गत अवयवांवर ताण येतो.  मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, नेत्रांसोबतच हृदय देखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे हृदय निकामी करायचे नसेल तर मधुमेह असेल वा नसेल तरीही तासन्तास एका ठिकाणी बसून न राहता, अधूनमधून उठा, उभे रहा आणि व्यायाम शक्य नसेल तर चालत राहाणे फायद्याचे आहे.