वाघांच्या स्थलांतरण मार्गाकडे होणारे दुर्लक्ष, मानवी हस्तक्षेप तसेच अधिवास खंडित होण्यामुळे समूहातच प्रजनन होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे भारतातील वाघांचे आनुवंशिक वैविध्य संपण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘मॉलेक्युलर बायोलॉजी अँड इवॉल्युशन’ या शोधपत्रिके त यावर अभ्यासदेखील प्रकाशित झाला आहे.

भारतात वाघांची संख्या गेल्या बारा वर्षांत दुप्पट झाली आहे. २००६ मध्ये १४११ तर २०१८ मध्ये २९६७ वाघ असल्याचे व्याघ्रगणनेतून समोर आले. मानवी हस्तक्षेप आणि प्रकल्पांमुळे वाघांच्या अधिवासक्षेत्रात घट होत आहे. जंगलातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या त्यांच्या स्थलांतरण मार्गात देखील अडथळे येत आहेत. महाराष्ट्रातील वाघांना हा धोका सर्वाधिक आहे कारण दोन जंगलातील संचारमार्गाच्या व्यवस्थापनात राज्य कमी पडले आहे. अजूनही संचारमार्गाचे गांभीर्य नसल्याने समूहातच प्रजनन होण्याचा सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे. अधिवासाच्या आणि जोडीदाराच्या शोधात वाघाचे स्थलांतरण होते. लांब पल्ल्याच्या वाघाच्या स्थलांतरणाची नोंदही महाराष्ट्रातच आहे. मात्र, त्याचवेळी या स्थलांतरणादरम्यान वाघ बेपत्ता झाले आहेत आणि मृत्युमुखीदेखील पडले आहेत. २०१४ साली वर्धा जिल्हयातील बोर अभयारण्यातून एका वाघाचे अमरावती जिल्हयातील पोहरा-मालखेडच्या जंगलात तर २०१६ साली नागपूर जिल्हयातील कळमेश्वर-कोंढाळी येथून एका वाघाने याच जंगलात स्थलांतर के ले होते. मात्र, त्यानंतर या वाघांचा काहीच पत्ता नाही. बोरमधील टी-२७ वाघीण स्थलांतरणाच्या प्रयत्नात वीजप्रवाहाचा शिकार ठरली. तर नागझिरा अभयारण्यातून उमरेड-करांडला अभयारण्यात गेलेला ‘जय’ बेपत्ता झाला. व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यात वाघ सुरक्षित आहेत, पण त्यांच्या संचारमार्गात अडथळे आहेत. जोडीदाराच्या शोधमार्गातील या अडथळ्यांमुळे समूहातील वाघांसोबतच मिलन होऊन प्रजनन होण्याची शक्यता आहे. राज्यात अलीकडेच दहा संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले. संचारमार्गासाठी ते योग्य असले तरीही व्यवस्थापनाचे गांभीर्य असेल तरच भविष्यातील ही भीती टाळता येणे शक्य आहे.

.. तर वाघांची पिढीच दिव्यांग!

वाघांसाठी संरक्षित असलेल्या क्षेत्रात वाघ सुरक्षित असले तरीही संचारमार्ग खंडित असल्याने एकाच कु ळातील वाघांबरोबर त्यांचे मिलन होण्याची शक्यता अधिक आहे. भविष्यात ही भीती खरी ठरल्यास वाघांची पिढी दिव्यांग ठरण्याचा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल तर इतर क्षेत्रातील जोडीदाराच्या शोधासाठी वाघांचे संचारमार्ग आधी सुरक्षित करावे लागतील, असे मत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी व्यक्त के ले.