वनविकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी गैरोला

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी डॉ. सुरेश गैरोला यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ए.के.निगम यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सर्जन भगत यांच्याकडे या पदाचा प्रभार होता. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे पद मोईपोकिन अय्यर यांच्या बदलीने गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार होता. मात्र, मुख्य वनसंरक्षक या श्रेणीत व्यवस्थापकीय संचालक हे पद अवनत झाल्याने डॉ. रामबाबू यांना प्रभारीवरून कायमस्वरूपी कार्यभार सोपवण्यात आला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रेणीतील सामाजिक वनीकरण पुण्याचे अतिरिक्त महासंचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.आर.चढ्ढांना पदोन्नतीने त्याच विभागात प्रधान मुख्य वनसंरक्षकपदावर नेमणूक करण्यात आली आहे. एफडीसीएम नागपूरचे मुख्य महाव्यवस्थापक जी. साईप्रकाश यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव अनुराग चौधरी यांना एफडीसीएमच्या महाव्यवस्थापकपदावर तर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग) नागपूर यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) या पदावर बदली करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) नितीन काकोडकर यांची पुण्यातच सामाजिक वनीकरण विभागात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदावर, महाराष्ट्र राज्य बांबू मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुनीता सिंग यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण नागपूरचे उपमहासंचालक व मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांची महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.

औरंगाबादचे वनसंरक्षक (कार्यआयोजना) व्ही.जे. वरवंटकर यांची नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग) तर, नाशिकचे मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक) अरविंद पाटील यांची नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक (वनसंवर्धन) पदावर बदली करण्यात आली आहे. पुण्यातील वनसंरक्षक (कार्यआयोजना) एम.सी. गणात्रा यांना नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक (भूमी अभिलेख) पदावर तर, नाशिकचे वनसंरक्षक (वन्यजीव) एस.व्ही. रामाराव यांना मुख्य वनसंरक्षक पदावर नाशिक येथेच पदोन्नती देण्यात आली आहे. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) संजय ठाकरे यांची महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे वनसंरक्षक (कार्यआयोजना) व्ही.एस. शेळके यांना चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

औरंगाबाद सामाजिक वनीकरणचे उपमहासंचालक व मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांची नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक(कार्य आयोजना) पदी तर, पुणे सामाजिक वनीकरणचे उपमहासंचालक व मुख्य वनसंरक्षक सर्फराज खान यांना कुंडल अकादमीच्या महासंचालकपदावर नेमण्यात आले आहे. ठाणे सामाजिक वनीकरणचे उपमहासंचालक व मुख्य वनसंरक्षक हे पद वनसंरक्षक श्रेणीत अवनत झाल्याने या पदावरील अन्वर अहमद यांच्या पदस्थापनेचे वेगळे आदेश जारी करण्यात येणार आहेत.

गडचिरोलीचे वनसंरक्षक (कार्य आयोजना) ए.डी. भोसले यांना औरंगाबाद सामाजिक वनीकरण येथे, नागपूरचे वनसंरक्षक (कार्य आयोजना) डब्ल्यू. एटबान यांना सामाजिक वनीकरण, नागपूर, तर त्यांच्या जागी चंद्रपूरचे वनसंरक्षक (कार्य आयोजना) एस.जी. चोपडे यांची बदली करण्यात आली आहे. यवतमाळचे वनसंरक्षक (कार्य आयोजना) यु.जी. कडलग यांना ठाणे सामाजिक वनीकरणचे, ठाणे वनसंरक्षक (वन्यजीव) एम.एम. कुळकर्णी सामाजिक वनीकरण पुणे, गोंदिया वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक तुषार चव्हाण यांची सिरोंचा वनविभागात उपवनसंरक्षक व तेथील उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ला यांची कोल्हापूर वनविभागात, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक आर.एम. नाईकडे यांची पुण्यात उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), कांदळवन कक्ष, मुंबईचे विभागीय वनाधिकारी एस.एन. माळी यांची सोलापूर वनविभागात उपवनसंरक्षक, तर या पदावरील एस.बी. बडवे यांची कोल्हापूर उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), एन.बी. गुदगे यांची भूमिलेख, पनवेल येथे उपवनसंरक्षक तर, या पदावरील एस.बी. केवटे यांची परभणी विभागीय वनाधिकारी, डी.बी. शेंडगे यांची ठाणे उपवनसंरक्षक(वन्यजीव), नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक विनिता व्यास यांची कोल्हापूर सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक, चांदोली कोयना वन्यजीव अभयारण्याचे विभागीय वनाधिकारी एम.एस. पंडितराव यांची कांदळवन कक्ष मुंबईत विभागीय वनाधिकारी, भंडाऱ्याचे सहाय्यक वनसंरक्षक अरविंद मुंडे यांची पुसद वनविभागात उपवनसंरक्षक आणि या पदावरील के.डब्ल्यू. धामगे यांची औरंगाबादचे विभागीय वनाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.