महानिर्मितीच्या कोराडी-खापरखेडा या विद्युत निर्मिती केंद्रातील ओझोन प्रकल्पातून औद्योगिक प्राणवायूचे उत्पादन शक्य आहे. त्याला वैद्यकीय प्राणवायूत बदलण्यासाठी ३ विशिष्ट कॉम्प्रेसर लागतात. त्यातही चीनमध्ये सध्या केवळ एकच कॉम्प्रेसर उपलब्ध आहे. दुसरीकडे या प्राणवायूची शुद्धता वाढवावी लागणार असून त्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांचे मतही जाणून घेतले जाणार आहे. त्यामुळे आता कॉम्प्रेसर उपलब्धता व तज्ज्ञांच्या मतावरच या प्राणवायू प्रकल्पाचे भवितव्य अवलबून आहे.

जिल्ह््यातील प्राणवायू तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधून महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील ओझोन प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती शक्य आहे काय, याची चाचपणी करायला सांगितले होते. समितीच्या निरीक्षणानुसार, खापरखेडा प्रकल्पात ५० क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा ओझोन प्रकल्प असून तो २००८  या वर्षातील आहे.  कोराडीत ६६० मेगावॅटच्या ३ युनिटमधील ओझोन प्रकल्प ३९० क्युबिक मीटरचा आहे. या प्रकल्पातून सध्या औद्योगिक प्राणवायू निर्मिती होत आहे. त्याला वैद्यकीय प्राणवायूत रुपांतरित करण्यासाठी  १३० मीटर क्युब प्रतितासाच्या ३ कॉम्प्रेसरची गरज आहे. सध्या  चीनमध्ये  एकच कॉम्प्रेसर उपलब्ध आहे.  या क्षेत्रातील कंत्राटदाराने तीन कॉम्प्रेसर उपलब्ध करण्याची तयारीही दाखवली आहे. दरम्यान, या ठिकाणी प्राणवायू उत्पादनानंतर त्याची शुद्धता ९० ते ९२ टक्के आवश्यक आहे. ती शक्य आहे काय, हे जाणून घेण्यासाठी  महानिर्मितीमधील तज्ज्ञांच्या समितीने या क्षेत्रातील तज्ज्ञाचे मत मागवले आहे. ही सर्व प्रक्रिया तातडीने करून प्राणवायू उत्पादन करायचे झाल्यास किमान १ महिन्याचा वेळ लागेल.  दरम्यान, या प्रकल्पासाठी तातडीने निविदा काढल्यास त्यात अमेरिकाही सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समितीकडून सादर होणाऱ्या अहवालात काय राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

…तर रोज १ हजार प्राणवायू सिलेंडरचे उत्पादन

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोराडीतील प्राणवायू प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर होऊन येथे प्रत्यक्षात प्राणवायूचे उत्पादन सुरू झाल्यास दिवसाला किमान १ हजार प्राणवायू सिलेंडरचे उत्पादन येथे होऊ शकते. परंतु यासाठी लागणारे कॉम्प्रेसर तातडीने नागपुरात आणणे आवश्यक आहे.