आक्षेप नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस

नागपूर : अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३३ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग तर २८ हजार विद्यार्थ्यांना दुसरा भाग भरला आहे. रविवारी अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीवर मंगळवापर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार आहे.

शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून राबवण्यात येत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. १९० महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसीच्या एकूण ५८ हजार २४० जागा होत्या. यापैकी तीन प्रवेश फेरीत २२ हजार ५०१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला होता. ३५ हजार ७४१ जागा रिक्त राहिल्या होत्या. दरम्यान, रविवारी प्रवेशाची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात आली. यात अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार आहे. याच दिवशी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. यात कोटय़ातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरून लॉक करता येईल. यानंतर ३० तारखेला पुन्हा अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. यानंतर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदवता येतील.

पदवीसाठी आजपासून प्रतीक्षा यादीनुसार प्रवेशाला सुरुवात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील ऑनलाईन पदवी प्रवेशासाठी २४ ऑगस्टपर्यंत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यात आले. मंगळवार २५ ऑगस्टपासून प्रतीक्षा यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत. विद्यापीठाने यावर्षी पदवी प्रवेशासाठी प्रथमच संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करीत, दहावी आणि बारावीची गुणपत्रिका अपलोड करण्याचे अनिवार्य केले. १७ जुलैपासून सुरू झालेल्या नोंदणीचा आकडा १२ ऑगस्टपर्यंत ८८ हजारावर गेला आहे. १७ तारखेला १२ वाजता गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी प्रकाशित करण्यात आली. यानंतर २० ते २४ ऑगस्टदरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात आले. यानंतर २५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. या प्रवेशानंतर महाविद्यालयात थेट प्रवेशास सुरुवात करण्यात येईल. यादरम्यान विद्यापीठाची नोंदणी सुरू राहणार आहे.