प्रशासन म्हणते, मंत्रिपदापूर्वीच पत्रिका छापल्या

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) स्थापना दिन समारंभाच्या कार्यक्रम पत्रिकेतून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसह अनेकांची नावे बेपत्ता आहेत. या सर्वाची नावे जाहीर होण्यापूर्वीच पत्रिका छापल्याने हा प्रकार घडल्याचे एम्स प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही पालकमंत्री व इतर पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

एम्स प्रशासनाने २ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता आयोजित केलेल्या स्थापनादिन समारंभासाठी छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तर इतर पाहुण्यांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाकले आहे. परंतु त्यात जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे नाहीत. त्यामुळे एम्स प्रशासनाला येथे केवळ विशिष्ट नेतेच बोलवायचे होते काय? अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात रंगली आहे.

केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने वर्ष २०१८-१९ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तात्पुरत्या स्वरूपात एम्सच्या ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सुरू झाली होती. यावेळी एम्सच्या मिहान परिसरातील बांधकामाला गतीही दिली गेली होती.

पत्रिकेत यांनाही स्थान

कार्यक्रमाला नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. प्रा. पी.के. दवे, वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या सचिव प्रीती सुदान उपस्थित राहणार असल्याचे नमूद करत सर्वाची नावे पत्रिकेत टाकण्यात आली आहेत.

एम्सचा स्थापनादिन कार्यक्रम बऱ्याच कालावधीपूर्वी ठरल्याने पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्य़ातील मंत्र्यांसह पालकमंत्री व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाली नव्हती. यामुळे त्यांची नावे पत्रिकेत येऊ शकली नाही. परंतु प्रशासनाने सगळ्यांना रितसर आमंत्रित केले असून ते मंचावर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम पत्रिकेबाबत कोणताही वाद नाही.

– मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स, नागपूर.