चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून समावेशासाठी हमालाचे काम बंद आंदोलन

अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या परवानाधारक हमालांना रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रूजू करवून घ्यावे, या प्रमुख मागणींसह इतर मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. याचा फटका प्रवाशांना बसला. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर सामानाची ने-आण करताना त्यांची दमछाक झाली.

रेल्वे प्रवाशांना सामान घेऊन जावे लागते. विशेषत: वयोवृद्ध आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागला.  सायंकाळी ५ वाजता हमालांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे सायंकाळी येणाऱ्या गाडय़ातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

रेल्वेस्थानकावर  १५५ हमाल आहेत. या सर्व हमालांना रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, ५० वर्षांवरील हमालांऐवजी त्यांच्या मुलांना घेण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी आज मथुरेत हमालांचे अधिवेशन होते. या अधिवेशनाला नागपुरातून काही हमाल गेले. इतरांनी आज रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी धरणे दिले.

तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००९ च्या अर्थसंकल्पात हमालांना चतुर्थी (ग्रुप डी) श्रेणी कर्मचारी घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक ट्रॅकमन आणि खलाशी आणि इतर अकुशल कामे देण्यात आली होती. तसेच पन्नाशी गाठलेल्या हमालांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला स्थानकावर काम करण्यास परवानगी देण्यात आली. तिच मागणी आता हमाल करत आहेत. या आंदोलनामुळे दिल्ली आणि हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक फटका बसला.