करोनाच्या या महासंकटाच्या काळात अनेक गोरगरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा असहाय्य लोकांच्या मदतीसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राज्यातील मान्यवर लेखकांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

अभूतपूर्व अशा या साथीच्या रोगाने  सारे जग विस्कळीत झाले आहे. यातून झालेला विनाशही विषमतामूलक आहे. अशाप्रसंगी  मानवतेसाठी  झटणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या डॉक्टरांना, परिचारिकांना आणि मागे न हटता आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.  या महासंकटामुळे कोटय़वधी लोक बेरोजगार झाले. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. अशा स्थितीत  देशातल्या सगळ्यात गरिबांनाही तेच उपचार मिळावे जे देशातल्या सगळ्यात श्रीमंतांना उपलब्ध आहेत.  प्रत्येकाने आपला घास आजूबाजूच्या लोकांसोबत वाटून खावा.  या भीषण परिस्थितीमध्ये प्रत्येक लेखकानेही त्यांना मिळालेले मानधन तसेच त्यांच्या उत्पन्नातील जास्तीत जास्त भाग शासनाच्या सहायता निधीस आणि सहायता करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना द्यावा, असे आवाहन सुधीर रसाळ, रामदास भटकळ, महेश एलकुंचवार ना. धों. महनोर, निशिकांत ठकार, रा. रं. बोराडे, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर , प्रभा गणोरकर, अरुण खोपकर, वसंत पाटणकर, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, कौतिकराव ठाले पाटील, मकरंद साठे, राजन गवस, जयंत पवार, लक्ष्मीकांत देशमुख, सतीश तांबे, जयदेव डोळे, सुनील तांबे, अनुराधा पाटील, प्रफुल शिलेदार, प्रवीण बांदेकर,गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रज्ञा दया पवार, रमेश उत्रादकर, नीरजा, नितीन रिंढे, किशोर कदम, प्रमोद मुनघाटे  यांनी केले आहे.