महाविद्यालयांना विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचाच त्रास

बारावीच्या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी  मेट्रोचे अधिकारी, सिमेंट रस्त्यांचे काम करणारे कंत्राटदार आणि वाहतूक पोलिसांना जाग आली आणि अनेक ठिकाणी महाविद्यालयांसमोरचे रस्ते आज मोकळे झाले. पहिल्या दिवसाचा अनुभव गाठीशी असला तरी विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करूनच वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पोहोचावे लागत आहे.

आज हिंदीचा पेपर असल्याने विद्यार्थी संख्येने कमी होते. कालचा अनुभव लक्षात घेत विद्यार्थी आज वेळेपूर्वी परीक्षा केंद्रांवर दाखल झाले. पालकांनी समंजसपणा दाखवत आज चारचाकी गाडय़ांचा मोह टाळला. तसेच शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन, मेट्रो कर्मचारी, सिमेंट रस्त्याच्या कर्मचारी आणि पोलिसांच्या प्रयत्नांनी बुधवारी झालेली कोंडी आज मात्र फुटली! इतर इयत्तांचे वर्गाच्या वेळा ११ ते २ या वेळांमध्ये टाळण्यात आल्या, तर मेट्रो कर्मचाऱ्यांनी या वेळेत काम बंद ठेवले.

शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे नॅशनल आणि न्यू इंग्लिश स्कूल अशा एका रांगेत असलेल्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी २४०० मुले आणि तेवढेच पालक होते. प्रत्येकालाच जायची घाई असल्याने वाहतूक खोळंबली. इंग्रजी पेपर सर्वानाच सक्तीचा असल्याने बुधवारी विद्यार्थी जास्त होते. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या आठ खोल्यांमध्ये परीक्षा होती. आज केवळ तीन खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदीचा पेपर दिला. धनवटे नॅशनलमध्ये जाण्यासाठी शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून रस्ता होता. शिवाय पालक ऐकता ऐकेनात. पाल्याच्या खोलीत प्रवेश द्यावा, यासाठी काही पालकांनी तर व्यवस्थापनाशी हुज्जत घातली. बारावीच्या परीक्षा केंद्रांवर वाहतूक कोंडीपेक्षाही पालकांचाच त्रास मोठा असल्याचा अनुभव प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे यांनी सांगितला.

मेट्रोचे लोक परीक्षेचे वेळापत्रक आज घेऊन गेले. काँग्रेसनगरातील  मेट्रोच्या कामामुळे परीक्षार्थीना होणाऱ्या त्रासापेक्षाही सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील निराला शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करीत परीक्षा केंद्रावर जावे लागले. शाळेकडे येणारे दोन्ही मार्ग बंद, एकीकडे मेट्रोचे काम तर दुसरीकडे रस्त्याचे काम. दुचाकी गाडीही शाळेपर्यंत नेता येत नाही. मेयोकडून मोमिनपुऱ्यातील गल्ल्यांमधून अग्रसेन चौकातून ‘यू टर्न’ घेऊन यावे लागते. महालच्या डीडी हायस्कूलची मुले, विनायकराव देशमुखच्या विद्यार्थ्यांना निराला हायस्कूल परीक्षा केंद्र मिळाले आहे. दुसरीकडे पारडीच्या प्रकाश विद्यालयात वाहन ठेवायलाही जागा नाही. शाळेच्या फाटकापर्यंत वाहतूक कोंडी होते आणि सिमेंट रोड, मेट्रो आणि पुलाचे काम त्याचठिकाणी सुरू  आहे. त्यांनी मागच्या फाटकाने रस्ता दिला. मात्र, बुधवारी बऱ्याच पालकांना माहिती नसल्याने विद्यार्थी उशिरा केंद्रावर पोहोचले. याशिवाय या केंद्रावर जाताना विद्यार्थ्यांसमोर रेल्वे लाईनचे फाटक हा देखील मोठा अडथळा आहे. अभय चव्हाण आणि यश या मंगळवारीला राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वेचे फाटक बंद झाल्याने १५-२० मिनिटे थांबावे लागले.

उत्तर अंबाझरी मार्गावरील एलएडी महाविद्यालयाचे केंद्र लाभलेल्या विद्यार्थ्यांनी कालचा अनुभव लक्षात घेता आज वेळेपूर्वीच परीक्षा केंद्र गाठणे पसंत केले. शंकरनगरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांना एलएडी केंद्र मिळाले आहे. मात्र, आज हिंदीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली. अकरा वाजतापासून तर २ वाजेपर्यंत मेट्रोचे सर्व काम थांबवण्यात आले  होते. गुरुवारी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने फारशी वाहतूक कोंडी दिसून आली नाही. हडस हायस्कूलमध्ये कालच्या तुलनेत विद्यार्थी लवकर आले. पालकांनी चारचाकी वाहन टाळले. काल पाचशे विद्यार्थी होते, त्यातुलनेत आज हिंदीच्या पेपरला १२७ विद्यार्थी असल्याने कोंडी फुटली.

मेट्रोचे चार आणि वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारी  सेवेत होता. शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या वेळेतही बदल केला होता. परीक्षेमुळे व्यवस्थापनांनी त्यांच्या इतर विद्यार्थ्यांच्या वेळांमध्ये बदल केला. वर्धा मार्गावरील स्नेहनगरातील संताजी महाविद्यालयात परीक्षेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीही परीक्षा सुरळीत पार पडली. मेट्रोच्या कामाचा फटका या विद्यार्थ्यांना बसला नाही.

परीक्षेच्या वेळेत मेट्राचे काम बंद

मेट्रो, वाहतूक प्रशासन आणि त्याहीपेक्षा महाविद्यालयाच्या प्रशासनाने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच उपाययोजना केली होती. परीक्षेच्या वेळेत कामामुळे होणाऱ्या आवाजाचा फटका बसू नये म्हणून मेट्रोने तीन तास काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला.