दोन दिवसांत सहा पुरुष, एका महिलेवर प्रयोग

नागपूर : भारत बायोटेक लि. आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधित लसीच्या मानवी चाचणीचा  नागपूरच्या केंद्रातही प्रारंभ झाला आहे. दोन दिवसांत या केंद्रात सहा पुरुष व एक महिला अशा सात जणांना ही लस देण्यात आली असून एकाही स्वयंसेवकात दुष्परिणाम दिसत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात सोमवारपासून या चाचणीचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी २५ आणि ३१ वर्षीय पुरुषासह ५३ वर्षीय महिलेला लस टोचली गेली. त्यानंतर मंगळवारी २०, २५, ४३, ३५ वर्षीय एकूण चार पुरुषांना ही लस दिली. लस देण्यापूर्वी सर्व स्वयंसेवकांची करोना चाचणी व रक्ताशी संबंधित काही चाचण्या

झाल्या. सुमारे ५० स्वयंसेवकांना लस देण्याची तयारी नागपूरच्या केंद्रात करण्यात आली आहे.

या लसीचे पहिल्या टप्प्यातील निरीक्षणही सकारात्मक आले आहेत. त्यामुळे आता नागपूरच्या चाचण्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील एकूण १२ केंद्रांवर या चाचण्या होत आहेत. १४ दिवसांनी पुन्हा त्याच व्यक्तींना लस टोचली जाणार आहे.

दोन दिवसांत सात स्वयंसेवकांना लस दिली असून सगळ्यांना आवश्यक काळजी घेण्यास सांगितले आहे. सगळ्यांशी रुग्णालयातील चमू संपर्कात  आहे. सध्या कुणावरही लसीचा दुष्परिणाम दिसला नाही.

–  डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय.

जगात सर्वात आधी भारतीय लस विकसित व्हावी

देशाचे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर सेवा देत असतात. त्याचप्रमाणे आपणही देशासाठी काहीतरी करावे, अशी मनात भावना होती. त्यामुळे या लसीच्या मानवी चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी झालो. याचा अभिमान वाटत आहे. जगात सर्वप्रथम भारतात ही लस विकसित व्हावी, देश करोनामुक्त व्हावा, अशी भावना ही लस टोचून घेतलेल्या स्वयंसेवकाने नाव न टाकण्याच्या अटीवर व्यक्त केली.