अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विद्यापीठाला इशारा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी सहज आणि मोठय़ा गुणांनी उत्तीर्ण झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑफलाईन परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची परीक्षा ऑनलाईन माध्यमातून देत सहज उत्तीर्ण होता यावे यासाठी  काही अनुत्तीर्ण  विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरले आहे. परीक्षा ऑनलाईन अन्यथा आत्महत्या करू, असा अजब इशारा देणारे संदेश काही विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांना पाठवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष वगळता इतर सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या (एटीकेटी) परीक्षा खोळंबल्याने ३० हजारांवर विद्यार्थी तणावात होते. मात्र, आता या परीक्षांची लवकरच घोषणा होणार असून ही परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन आणि ‘मिक्स मोड’ अशा तीन प्रकारात होणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार असून यासाठी विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेने मान्यताही दिली होती. मात्र, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी या परीक्षा प्रकाराला प्रखर विरोध केला. ऑनलाईन परीक्षेतून परीक्षेची गुणवत्ता ढासळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता अंतिम वर्ष वगळता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची  ऑफलाईनच परीक्षा घ्यावी, अशी मागणी आता प्रशासनाकडूनच होत आहे.  विद्यार्थ्यांनी मात्र याचा विरोध केला आहे. विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घ्यावी अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला आहे. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी काही अधिकाऱ्यांच्या क्रमांकावर संदेश पाठवत अशी असा इशारा दिल्याने विद्यापीठ प्रशासनही हादरले आहे.   विद्यापीठ प्रशासनाला अशाप्रकारे वेठीस धरणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

३० हजारांवर विद्यार्थी

अंतिम वर्ष वगळता परीक्षा देणारे ३० हजारांहून जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यांच्या मागील सत्रातील अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा अद्यापही झाली नाही. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेतली त्याप्रमाणेच आमचीही परीक्षा ऑनलाईन घेऊन समान न्याय द्यावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.