तंत्रज्ञान क्षेत्रात संमिश्र युक्तिवाद
अभियांत्रिकीचे शिक्षण झेपत नसल्याने विद्यार्थी मूलभूत विज्ञान (बेसिक सायन्स) शाखेकडे वळत असल्याचे तंत्रज्ञान क्षेत्रातील माहीतगारांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी मूलभूत विज्ञान शाखांकडे वळत असल्याचा आनंद, विज्ञान महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक व्यक्त करीत असले तरी अभियंत्यांच्या जागांवर मूलभूत विज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याचा सूक्ष्म भेद या तंत्रज्ञान क्षेत्रातील काहींनी व्यक्त केला आहे.
राज्यात अभियांत्रिकीच्या ६० हजार जागा रिक्त राहणे, शिक्षणाचा घसरलेला स्तर आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून खास करून आयआयटी आणि एनआयटीच्या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षण तज्ज्ञांकडून अभियांत्रिकी महाविद्यालये बेरोजगारांची फौज तयार करीत असल्याचा आरोप हे सर्व पाहू जाता, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल ओसरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांना तसे वाटत नाही. या दोन स्वतंत्र शाखा असून, या दोन्ही शाखा एकमेकांची जागा घेऊ शकत नाही. या दोन्ही शाखा मोठय़ा आहेत. मात्र, अभियांत्रिकीचे विद्यार्थी प्रवेश रद्द करून मूलभूत विज्ञान शाखेत येत असल्याची शक्यता नाकारली जात आहे.
विज्ञान महाविद्यालयातील पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र या मूलभूत विज्ञान शाखांकडे विद्यार्थी पुन्हा प्रवेश घेऊ लागले असून खास करून विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून प्रवेश मिळवत असल्याचा दावा काही महाविद्यालयात केला जात आहे. ज्यांना मूलभूत विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यायचा आहे, असे विद्यार्थी १२वी झाल्यानंतर लगेच विज्ञान शाखेत जातात. मात्र, आधी अभियांत्रिकी महाविद्यालयात लाखो रुपये शुल्क भरून प्रवेश घेणारे विद्यार्थी नंतर प्रवेश रद्द करून मूलभूत विज्ञानाकडे वळतात, याचे शासकीय तंत्रनिकेतनमधील टेक्सटाईल तंत्रज्ञानाचे प्रमुख दीपक कुळकर्णी यांनी खंडन केले आहे. विविध कंपन्यांशी संबंध असलेले कुळकर्णी म्हणाले, आतापर्यंत एकाही कंपनीतून अशी माहिती मिळाली नाही की अभियांत्रिकी ऐवजी आम्ही बेसिक सायन्सच्या पदवीधारकांना प्राधान्य देतो. मुळात अभियांत्रिकीचे शिक्षण झेपत नसल्याने विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे वळतात.
मूलभूत विज्ञानाचा अभ्यास करून कंपन्यांमध्ये नोकरीला लागलेले जे विद्यार्थी अभियंत्यांपेक्षा कमी पगारावर काम करायला तयार असतात अशांचा पर्यवेक्षक स्तरीय कामांसाठी विचार केला जातो. मुळात अभियांत्रिकी सोडून विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे का वळतात. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या विद्यार्थ्यांना उशिरा साक्षात्कार होऊन ते बेसिक सायन्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. मात्र, बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रथम सत्रातच गटांगळ्या खायला लागतात. सहा विषयांपैकी तीन किंवा चार विषयात काही तर सर्वच्या सर्व विषयांमध्ये नापास होतात, असे विद्यार्थी बेसिक सायन्सकडे वळतात. किंवा पॅकिंग, फोल्डिंग वगैरे क्षेत्रात देखरेख करणाऱ्यांसाठीही मूलभूत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा विचार होऊ शकतो. या ठिकाणी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पगारही चांगला मिळतो, असे कुलकर्णी म्हणाले.