विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश

नागपूर : झिंगाबाई टाकळी येथील पोलीस खात्याची आणि खापरखेडा येथील महानिर्मिती कंपनीची कोटय़वधी रुपयांची जमीन एका खासगी कंपनीला देण्याची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गृहखात्याला दिले. त्यामुळे मागील सरकारने केलेल्या जमीन व्यवहाराची सत्यता समोर येण्याची शक्यता आहे.

मौजा झिंगाबाई टाकळी, नागपूर येथील खसरा क्रमांक २९१ मधील ५.७५ एकर जमीन रामदेव बाबा सार्वजनिक समिती नागपूर या

खासगी संस्थेला देण्यात आली. ही जमीन पोलीस खात्याची असून तिची किंमत सुमारे १०० कोटी आहे. तत्कालिन मंत्रिमंडळाने २० मार्च २०१८ ला निर्णय घेऊन खासगी संस्थेला ही जमीन बहाल केली. तसेच कोराडी सुपर-क्रिटिकल थर्मल पॉवर स्टेशन (महानिर्मिती), मौजा-खापरखेडा, ता. कामठी येथील खसरा क्रमांक ६६.८७

ही तलावाची १० एकर जमीन भारतीय विद्याभवन या खासगी संस्थेला ३ नोव्हेंबर २०१५ ला देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.ची वर्धा मार्गावरील काही जमीन

खासगी संस्थेला देण्यात आली. हे सर्व जमीन व्यवहार व्यक्तिगत संबंधातून झाले आहेत. हे सर्व व्यवहार नियम, कायदे आणि संविधानिक तरतुदींना डावलून करण्यात आले आहेत, अशी तक्रार नाना पटोले यांच्याकडे अ‍ॅड. सतीश उके यांनी केली. शासकीय

जमिनी खासगी संस्थांना वाटण्याची ही प्रकरणे अत्यंत गंभीर असल्याने मी या तक्रारी गृहमंत्र्यांकडे चौकशी आणि पुढील कारवाईसाठी पाठवित आहे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.