19 October 2019

News Flash

धोकादायक कचराघर विमानतळ परिसरात!

प्राधिकरणास मात्र माहितीच नाही

प्राधिकरणास मात्र माहितीच नाही

नागपूर महानगर प्रादेशिक विकास आराखडय़ानुसार हिंगणा तालुक्यातील पोही आणि मांडवा या दोन गावांत कचराघर (डम्पिंग यार्ड) प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे, हा भाग नागपूर विमानतळाच्या २० किमीच्या परिसरात येत असूनही यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाला मात्र याची माहितीच देण्यात आलेली नाही.

महापालिका हद्दीपासून २५ कि.मी. अंतरापर्यंत  नागपूर महानगर विकास क्षेत्र विस्तारले आहे. यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, पारशिवनी, मौदा, कामठी हे तालुके आहेत. यासोबतच  सावनेर, कळमेश्वर, उमरेड आणि कुही तालुक्यातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. यानुसार मेट्रो रिजनमधील हिंगणा तालुक्यातील पोही आणि मांडवा या दोन गावात डम्पिंग यार्ड प्रस्तावित आहे. मेट्रो रिजनच्या परिसरातील कचरा येथे गोळा केला जाणार आहे. डम्पिंग यार्डचा परिसर नागपूर विमानतळापासून २० किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार डम्पिंग यार्ड २० किमीपेक्षा कमी अंतरावर असता कामा नये. याचे प्रमुख कारण येथे सर्वच प्रकारचा कचरा असतो. त्यामुळे पक्षी त्या भागात सातत्याने घिरटय़ा घालत असतात. या पक्ष्यांचा धोका विमानांना उतरताना आणि झेप घेताना होण्याची शक्यता असते. शिवाय हा परिसर बुटीबोरी एमआयडीसीमध्ये येतो. त्यामुळे उद्योगांना देखील अडचण निर्माण होऊ शकते, याकडे लक्ष वेधत डम्पिंग यार्डाची जागा बदलण्याची मागणी जय जवान जय किसान संघटनेने केली आहे, परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, एनएमआरडीएने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला डम्पिंग यार्डबाबत कळवलेलेच नाही. एनएमआरडीएचा प्रस्ताव आल्यास प्रस्तावित डम्पिंग यार्डचा विमानतळाला धोका होऊ शकेल की, नाही याचा अभ्यास केला जाईल. तसेच धोक्याची पातळी देखील कळू शकेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक व्ही.एस. मुळेकर म्हणाले.

सरकार म्हणते, ढीग गोळा होणार नाही!

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६  नुसार विमानतळ आणि कचराघर यांच्यातील अंतर २० किमी पेक्षा कमी नको. पण, कळमेश्वर परिसरात प्रस्तावित डम्पिंग यार्डला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने पोही आणि मांडवा परिसरात डम्पिंग यार्ड दिला आणि आराखडा मंजूर केला. यासंदर्भात राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. त्यामुळे ढीग जमा होणार नाही तसेच दरुगधीही कमी असेल.

विकास आराखडा मिळाल्यानंतर आमचे पथक अभ्यास करेल. त्यात स्थळ आणि दिशा बघितली जाईल. शिवाय एमएडीसीला देखील अभ्यास करावा लागेल. दोन्ही अहवाल आल्यावर डम्पिंग यार्डला मान्यता दिली जाईल किंवा काही अटी घातल्या जातील.    – युधिष्ठिर साहू, महाव्यवस्थापक, हवाई वाहतूक, नागपूर

First Published on May 9, 2019 10:02 am

Web Title: lack of waste management in nagpur 3