तीन तरुणीकडून सकारात्मक जीवनतंत्राचे धडे; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

मानसिक नैराश्यग्रस्तांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. त्यातही तरुणाईचे प्रमाण जास्त आहे, पण मानसिक नैराश्यातून बाहेर पडणाऱ्यांसाठी अजूनही सक्षम सामाजिक व्यासपीठ आपल्याकडे नाही. ती व्यवस्था, तो मार्ग आता उपराजधानीतील तरुणाईनेच उपलब्ध करून दिला आहे. शर्मिष्ठा हरदास, अदिती तिडके आणि प्राची आर्या या तीन तरुणी मानसिक नैराश्यग्रस्तांना ‘डिअर माईंड..’ म्हणत नव्याने आयुष्य जगायला शिकवत आहेत. दोन महिन्यात अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालेल्या शर्मिष्ठा आणि आदितीने लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत मानसिक नैराश्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी कसा बदलला हे विस्ताराने सांगितले.

कोणतीही गोष्ट करण्यासाठी काहीतरी निमित्त असावे लागते. यानिमित्त या विधायक उपक्रमालाही कारणीभूत ठरले. शर्मिष्ठाला आलेल्या ‘पॅनिक अटॅक’ने या मैत्रिणींचे जगच बदलवून टाकले. शर्मिष्ठासोबत अदिती राहायची. तिला सावरताना या व्यासपीठाची गरज जाणवू लागली. दोघींमधल्या संवादातून शर्मिष्ठाच्या मनातल्या गोष्टी बाहेर आल्या आणि ‘मी कोण..?’ हा उलगडा होत गेला. यातून बाहेर पडताना मग ‘डिअर माईंड..’ चा जन्म झाला. मानसिक नैराश्य हा आपल्या देशात अजूनही आजार समजला जातो, पण तो आजार नाही. शरीराप्रमाणेच मनाला देखील थकवा येतो, हे कुणी समजून घ्यायलाच तयार होत नाही. ही बाब आम्ही पॉवरपॉईंट सादरीकरणातून मांडली असती तर लोकांपर्यंत पोहोचले नसते. म्हणूनच कलेचा आधार घेत आम्ही पहिला कार्यक्रम कॉमेडियनसोबत केला. त्यांच्यासोबत या कार्यक्रमात लोक हसले, पण त्यातून आम्हाला जो संदेश त्यांना द्यायचा होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. स्वतंत्रपणे केलेल्या कार्यक्रमात ३५ ते ४० मुले आली. आम्ही जमिनीवर दरी अंथरली आणि त्यांना बसायला लावले. मनातले लिहून आणू नका तर मन व्यक्त होऊ द्या, हे त्यांना सांगितले. आधी आम्ही आमचा अनुभव त्यांच्यापुढे मांडला, कारण जाहीरपणे व्यक्त होताना एक भीती मनात असते. त्यानंतर मात्र एक एक जण व्यक्त व्हायला लागला. जनजागृतीच्या पहिल्या प्रयत्नाला आलेले ते यश होते. लोकांना कर्करोग माहिती आहे, पण मानसिक आजार माहिती नाही. शारीरिक आरोग्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच मानसिक आरोग्याची काळजीही महत्त्वाची हे लोकांना पटवून देण्यासाठी ‘डिअर माईंड..’ आता मोठे व्यासपीठ ठरत आहे. उपराजधानीतील दोन कार्यक्रमातून तब्बल ३५० लोकांची मदत आम्ही करू शकलो, हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आता लोक आमच्याशी जुळत आहेत. स्वत:हून व्यक्त होत आहेत. आमच्याशी संपर्क साधत आहेत, हा प्रतिसाद आम्हाला मोठी प्रेरणा देतोय, असे शर्मिष्ठा हरदास आणि अदिती तिडके यांनी सांगितले.

पुढचा टप्पा ‘लेट्स टॉक’

पुढचा कार्यक्रम  पुण्यात करत आहोत. त्यानंतर हैदराबाद, बेगळुरू. शाळांमध्ये  जातोय. प्रत्येक रंगाला एका भावनेची जोड देऊन त्यातून मानसिक नैराश्यातील व्यक्तींना व्यक्त होण्याचा एक मार्ग उपलब्ध करून देत आहोत. यानंतर ‘लेट्स टॉक’ हा उपक्रम राबवणार आहोत. ‘इट्स ओके, नॉट टू बी ओके’ हे आम्ही लोकांना सांगतोय. जानेवारी २०१९ मध्ये व्यक्त होण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ आणतोय. याठिकाणी  मानसोपचार तज्ज्ञ  व्यक्त होणाऱ्याला फक्त ऐकतील आणि गरज असेल तरच  उपचार करतील. समाज माध्यमांवरील ‘डिअर माईंड’वर मानसिक नैराश्याने ग्रस्त लोक त्यांच्या कथा पाठवत आहेत. हा प्रतिसाद थक्क करणारा आहे, असे या तरुणींनी सांगितले.

काही अनुभव असेही

* कार्यक्रम सुरू असताना आजोबांच्या आठवणीने एक मुलगा रडायला लागला. त्यावेळी तेथीलच एका मुलीने त्याच्या पाठीवर हात ठेवला.  आधार मिळताच त्याने रडण्याचे कारण सांगितले. आम्हाला सांगण्याची गरजच पडली नाही. तो आधाराचा हात त्याला सावरून गेला.

* दोन मुले अशी होती, ज्यात दोघांच्याही जीवलग मित्राचा मृत्यू झाला होता. त्यातून एक सावरला, पण एक मात्र अजूनही धक्क्यातून बाहेर पडला नव्हता. सावरलेल्या त्या दुसऱ्या मित्रानेच त्याला आधार दिला आणि स्वत:साठी नाही तर मित्रासाठी जगण्याचा सल्ला दिला.