19 September 2020

News Flash

‘स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पोषक’

म्हणूनच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या समित्या गठीत करून सांस्कृतिक आलेख वाढता ठेवला जातो.

‘लोकसत्ता’च्या वक्ता दशसहस्रेषु ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पोषक असून मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठलाच पक्षपात केला जात नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली.

‘लोकसत्ता’ आयोजित, वीणा वर्ल्ड प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बँक ऑफ महाराष्ट्र, दि विश्वेश्वर को-ऑप. बँक लिमिटेड, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट, औरंगाबाद (आयसीडी) आणि ‘एमआयटी’ (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू असून येत्या १० फेब्रुवारीला विभागीय अंतिम फेरी आयोजित करण्यात आली असून महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारीला होणार आहे.

अगदी टोकाची स्पर्धा सर्वच क्षेत्रात असताना विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड अनेक वर्षांची आहे. त्यामुळेच काहीशी शिथिलता मधल्या काळात आली होती. अनेक स्पर्धा लोप पावल्या. काही स्पर्धा तर महाविद्यालयांमध्ये केव्हा आयोजित केल्या जातात आणि केव्हा संपतात याचा थांगपत्ताही लागत नाही, एवढय़ा शांतपणे घेतल्या जातात.

मात्र, हल्ली ‘नॅक’ही महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाकडे लक्ष पुरवत असल्याने महाविद्यालयांना या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे या क्षेत्रातील योगदान आणि त्यासाठी महाविद्यालयाचे मिळालेले पाठबळ याचीही शहानिशा नॅक करीत असते.

म्हणूनच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या समित्या गठीत करून सांस्कृतिक आलेख वाढता ठेवला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारीही करून घेतली जाते. सर्वच महाविद्यालयांमध्ये नाही पण, लोकप्रिय, जुन्या आणि पायाभूत सुविधा असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी धडपडत असतात, हे लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेनिमित्त समोर आले.

स्पर्धेला एक दर्जा आहे

लोकसत्ता हे वृत्तपत्र दर्जेदार आणि निर्भीड मत मांडणारे मराठीतील उत्कृष्ट दैनिक आहे. गेल्या तीन वर्षांपासून लोकसत्तातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि इतर ज्वलंत विषयावर युवकांच्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी एक सुवर्णसंधी लोकसत्ताने प्राप्त करून दिली आहे. त्यात ही स्पर्धा मराठीतून होत असल्याने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाला चालना देण्यासाठी साह्य़ मिळते. स्पर्धेसाठी विषय दर्जेदार आणि चालू घडामोडींशी संबंधित असून त्याविषयीचे मत विद्यार्थी मांडत असल्याने स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश सफल होताना दिसतो.

डॉ. कांतेश्वर ढोबळे, समन्वयक, वादविवाद आणि वक्तृत्व समिती, केसरबाई लाहोटी कॉलेज

 

स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना

महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतली जाते. आपले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर जावेत, असा आमचा आग्रह असतो. त्यासाठी कोणत्या विद्यार्थ्यांला कोणत्या स्पर्धेला पाठवायचे यासाठीही आम्ही नियोजन करतो. लोकसत्ता आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना रुजवण्याची धडपड दिसते. आजच्या जातीपातीच्या राजकारणात ते फार महत्त्वाचे आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी लोकांकिका आणि आता वक्तृत्व स्पर्धेतही भाग घेतला. दोन्हीच्या आयोजनात लोकसत्ताचे नियोजन उत्कृष्ट होते आणि कुठलाही पक्षपात त्यात दिसून आला नाही. उलट वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी विभागीय अंतिम फेरीत नाही पोहोचले पण, त्यातून त्यांना त्यांच्या चुका कळल्या आणि काय करायला हवे याचेही भान आले.

डॉ. ज्ञानेश्वर खडसे, समन्वयक, सांस्कृतिक समिती, धनवटे नॅशनल कॉलेज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:48 am

Web Title: loksatta vaktrutva spardha 7
Next Stories
1 ‘आदर्श’ गाव योजना फसली?, दोन वर्षांत एकही गाव आदर्श नाही
2 कारवाईत पक्षपातीपणा
3 निवडणुकीनंतर  कर वसुलीची सक्ती
Just Now!
X