प्रवेशपूर्व परीक्षांच्या तयारीसाठी केवळ ४५०० अर्ज

नागपूर : राज्यात ५२ टक्क्यांहून अधिक इतर मागासवर्गीय (ओबीसी) असतानाही एमएच- सीईटी/  जेईई/ नीट परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांची वानवा आहे. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातून दिलेल्या मुदतीत राज्यातून केवळ ४५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून २० जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाज्योती, नागपूरच्या वतीने एमएच-सीईटी/ जेईई/ नीट परीक्षांच्या ऑनलाइन पूर्वतयारीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. महाज्योती ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांची नि:शुल्क तयारी करवून देणार आहे. त्यासाठी १० जानेवारीपर्यंत संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु राज्यातील केवळ साडेचार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

राज्य शासनाने ओबीसीसाठी ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेचे कार्यालय नागपुरात सुरू केले आहे. ते ऑगस्ट २०२० मध्ये सुरू झाले असून, सर्वप्रथम ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. १२ वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व इतर महत्त्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा जेईई/ एमएच-सीईटी/ नीट परीक्षा द्यावी लागते. ओबीसी, व्हीजे, एनटी विद्यार्थ्यांना यासाठीची महागडी शिकवणी परवडणे शक्य नाही. म्हणून महाज्योतीने २०२२ मध्ये होणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसींच्या १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.

महाज्योती प्रशिक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के, नागरी विभाग १५ टक्के, नगरपंचायती १५ टक्के व आदिवासी व नक्षलग्रस्त विभागासाठी १५ टक्के जागा उपलब्ध आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा म्हणून नोंदणीची मुदत वाढवण्यात आली. तसेच उत्पन्न दाखलाऐवजी नॉन-क्रीमीलेअरची अट घालण्यात आली आहे.

      – प्रा. दिवाकर गमे, महाज्योतीचे संचालक