प्रशासनाची चिंता वाढली

महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील सर्वात जुना सदस्य ‘अजय’ गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहे. २९ मार्चला जाईचे निधन झाले होते. त्यातून बाहेर पडण्याआधी अजयच्या प्रकृतीने प्राणिसंग्रहालय प्रशासनाला चिंतेत टाकले आहे.

२०-२५ वर्षांपूर्वी नर आणि मादी सिंहाची जोडी या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण होते. त्यांच्या मृत्यूनंतर महाराजबाग ओस पडण्याच्या मार्गावर असताना ‘गोपाल’ आणि ‘ज्युली’ या बिबट जोडीने याठिकाणी ‘अजय’ला जन्म दिला होता. त्याच्या जन्मानंतर पर्यटक पुन्हा या प्राणिसंग्रहालयाकडे वळू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे आठ बिबट याठिकाणी आणण्यात आले. बिबटय़ांची संख्या अधिक आणि पिंजरे कमी व गंज चढलेले अशी त्यावेळची स्थिती होती. त्यावेळी बिबटय़ांना इन्फेक्शन होत असल्याची देखील चर्चा होती. सिमेंटमुळे बिबटय़ांचे पाय वाकडे होत होते. ‘अजय’ देखील दोनदा मृत्यूच्या दाढेतून परत आला. १९ वर्षांच्या अजयने पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालय प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. १९९९ मध्ये जन्मलेला ‘अजय’ गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ असून त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली आहे. कॅल्शिअमची पातळीखाली आली आहे. डॉ. कडू आणि डॉ. रवि त्यावर उपचार करत असल्याचे महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितले.