नियोजित लेआऊटपासून मेट्रो धावणार असल्याचे खोटे आमिष

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : मेट्रोचा विस्तार शहरालगतच्या ग्रामीण भागापर्यंत होणार असल्याचे जाहीर होताच या प्रकल्पाच्या  संकल्पचित्राचा वापर भूखंड विक्रेत्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी सुरू केला आहे. यापूर्वी मिहान प्रकल्पाच्या संदर्भात असा प्रकार घडला असता त्यावर सरकारने र्निबध आणले होते. मेट्रोनेही यासंदर्भात पाऊल टाकण्याचे सूतोवाच केले आहे.

कुठल्याही शहराचा विकास तेथील पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. रस्ते, दळणवळणाच्या सोयींमुळे जमिनीच्या किंमतीत वाढ होते. त्यामुळे एखाद्या नव्या पायाभूत प्रकल्पाची घोषणा झाली की त्या भागातील भूखंड व्यावयासिक मोठय़ा चतुराईने संबंधित प्रकल्पाचा वापर आपल्या व्यावसायिक वाढीसाठी करतात. अलीकडेच शासनाने मेट्रो विस्ताराला (मेट्रो टप्पा -२) मंजुरी दिली. त्यानुसार कामठी मार्गावर कन्हानपर्यंत, वर्धा मार्गावर  बुटीबोरीपर्यंत, हिंगणा मार्गावर हिंगणा गावापर्यंत आणि भंडारा रोडवर ट्रांसपोर्ट नगपर्यंत मेट्रो धावणार आहे. या विस्तारित मार्गालगतच्या जमिनीच्या किंमतीत तर वाढ झालीच आहे. पण, ज्या भागापासून हा प्रकल्प लांब आहे तेथील भूव्यावसायिकही आराखडय़ाच्या संकल्पचित्राचा वापर भूखंड विक्रीच्या जाहिरातीसाठी करू लागले आहेत. नियोजित लेआऊटपासून मेट्रो धावणार असे भासवले जात आहे. वर्धा, हिंगणा, कामठी आणि भंडारा मार्गावरचे हे सार्वत्रिक चित्र आहे.

वर्धा मार्गावरचे उदाहरण लक्षात घेतले तर प्रस्तावित मेट्रोचा बुटीबोरीपर्यंतचा विस्तार हा रेल्वेलाईनच्या बाजूने होणार आहे. तिचा बुहतांश मार्ग हा मिहान किंवा एमआयडीसीलगतचा आहे, असे असतानाही बेसाबेलतरोडी भागातील व्यावसायिक त्यांच्या भूखंड जाहिरातीत मेट्रोच्या संकल्पचित्राचा वापर करीत आहे. तशा प्रकारचे ‘पत्रक’ वर्तमान पत्रासोबत वितरित केले जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी ती वाटली जात आहेत. रेडिओच्या खासगी वाहिन्यांवरही जाहिराती प्रसारित केल्या जातात. यातून नागरिकांची दिशाभूल होण्याचा धोका आहे.

यासंदर्भात सिटीझन्स फोरमचे श्री. चेडगे म्हणाले, कुठल्याही सरकारी प्रकल्पाचे संकल्पचित्र व्यावसायिकांनी जाहिरातीत वापरणे चुकीचे आहे. ही बाब टाळण्यासाठी सरकारकडून काही धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा, चुकीचा संदेश जाऊ शकतो.

मेट्रो प्रकल्पाचे संकल्पचित्र कुठलीही परवानगी न घेता वापरले जात असेल तर ही गंभीर बाब आहे. असे प्रकार होणार नाही, यासाठी काळजी घेतली जाईल.

– महामेट्रो.