सर्वीस मार्गाकरिता वारंवार सूचना करुनही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेतली होती. आमदार डॉ. भोयर स्वत: बांधकामस्थळी पोहचून समृद्धी महामार्गाच्या सुरक्षा भिंतीचे काम बंद पाडले. वर्धा-सेलू विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात समृद्धी मार्गाचे काम सुरु आहे.
रमना फाटा, कान्हापुर-गोंदापुरसह आजूबाजूच्या परिसरात समृद्धीच्या संरक्षणभिंतीचे काम सुरु आहे. परंतू या दरम्यान सर्वीस रोड सोडण्यात न आल्याने शेतक-यांना शेतामध्ये जाण्याकरिता संकटाचा सामना करावा लागत आहे. यासंबंधी वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. प्रशासनाचे अधिकारी व समृद्धीच्या व्यवस्थापनाला याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
परंतू त्याकडे डोळेझाक करण्यात आली. शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार डॉ.पंकज भोयर यांची भेट घेतली. आमदार भोयर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शेतक-यांसह बांधकामस्थळी पोहचले. तिथे जात कंपनीच्या अधिका-यांना खडे बोल सुनावले. इतकेच नव्हे तर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत काम करु देणार नाही. असा इशारा देत काम बंद केले.
महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतांमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचून रहात असल्याने शेतक-यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. अशा स्थितीमध्ये संरक्षण भिंत बांधतेवेळी सर्विस रस्ता सोडणे अत्यंत गरजेचे आहे. या समस्येकडे डोळेझाक करण्यात आली तर पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा आमदार भोयर यांनी केला. यावेळी सेलू तालुका भाजपा अध्यक्ष अशोक कलोडे, संघटन महामंत्री संजय अवचट तसेच ज्ञानेश्वर भुजबाइले, धनराज इखार ,वामन बोरकर व अन्य सहभागी होते