* रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा फटका
* नागपूर, वर्धा जिल्ह्य़ातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

नागपूर आणि वर्धा जिल्ह्य़ातील आश्रमशाळेत राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी फिरत्या आश्रमशाळा वैद्यकीय पथकावर आहे, परंतु रामटेक उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ पैकी ५ पदे रिक्त आहे. त्यामुळे या पथकाला रामटेक उपजिल्हा रुग्णालयातच सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात एकाही आदिवासी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली नसून विद्यार्थ्यांना काही झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शहर, नागपूर ग्रामीण भागासह वर्धा जिल्ह्य़ातील सगळ्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा व वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता स्वतंत्र फिरते वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे. या पथकात १ वैद्यकीय अधिकारी, १ फार्मासिस्ट, १ परिचारिका, १ वाहन चालक, १ सहायक यांचा समावेश आहे. त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांच्या अखत्यारित नागपूर आणि वर्धा जिल्ह्य़ातील ४० हून जास्त आश्रमशाळेची जबाबदारी दिली असून प्रत्येक संस्थेमध्ये २०० हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत  आहेत.

पथकाला आश्रमशाळेचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर नित्याने वेगवेगळ्या संस्थेला भेटी देऊन तेथील सगळ्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणे अपेक्षित होते, परंतु या पथकाला संलग्न केलेल्या रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ७ पैकी ५ पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तेव्हा या पथकाला प्रशासनाकडून येथेच सेवेवर लावण्यात आले आहे. त्यामुळे जुन ते जुलै दरम्यान विद्यार्थ्यांचे वर्ष २०१६-१७ चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावरही एकाही आदिवासी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीच झाली नाही. तेव्हा दुर्गम, आदिवासी पाडे, मागास भागातून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना काही आजार असल्यास व त्यांचे काही बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकशी करणार

नागपूर जिल्ह्य़ातील आश्रमशाळांसह शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या वैद्यकीय पथकासह फिरते आश्रमशाळा वैद्यकीय पथकाकडून केली जाते. माझ्याकडे तसे अहवालही नित्याने येतात, परंतु या प्रकरणाची जातीने चौकशी करून रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनाही माहिती मागण्यात येईल.

– डॉ. उमेश नावाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर

पथकाला स्वतंत्र रुग्णवाहिकाही नाही

फिरते आश्रमशाळा वैद्यकीय पथकाला प्रत्येक आश्रमशाळेच्या वसतिगृहाला भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागते. तेव्हा या पथकाकडे स्वतंत्र रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे, परंतु पथकाला अद्याप हक्काची रुग्णवाहिकाच दिली नाही. त्यातच गेल्या सत्रात पथकाने रामटेक उपजिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या रुग्णवाहिकेत आश्रमशाळेत जाऊन तपासणी केली होती. तेव्हा या पथकाला हक्काची रुग्णवाहिका केव्हा मिळणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.