नागपुरात ‘इनक्युबेइशन सेंटर’;  मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

‘डिजिटल इंडिया’वर देश काम करीत असून ‘भीम अ‍ॅप’ हे देशातल्या गरीब जनतेचा आर्थिक आवाज म्हणून पुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजीधन’ मेळाव्यात व्यक्त केला. याच कार्यक्रमात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी युवकांना उद्योजक बनण्याचे प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात ‘इनक्युबेइशन सेंटर’ स्थापन करण्याची घोषणा केली.

नीती आयोगाच्यावतीने मानकापूर येथील क्रीडा संकुलात  झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोराडी सुपर क्रिटीकल औष्णिक वीज प्रकल्पाचे लोकार्पण तसेच विविध प्रकल्पाच्या भूमिपूजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रामदास आठवले आणि हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार, मंत्री गिरीश महाजन, प्रकाश मेहता, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित होत आहे. या भागातील युवकांना उद्योजकत्वाचे धडे मिळण्यासाठी म्हणून सुमारे २० हजार चौ.मी.चे ‘इनक्युबेइशन सेंटर’ येथे स्थापन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन युवकांना येथे मिळेल. जेणेकरून ते संघटनात्क पद्धतीने व्यवसाय सुरू करू शकतील. युवकांना येथे स्वतंत्रपणे नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन देखील दिले जाईल, असे प्रसाद म्हणाले.यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर महापालिकेने सांडपाणी महाजनकोला वीज निर्मितीकरिता विकले. त्यामुळे महापालिकेला १८ कोटी रुपयांचा फायदा मिळाला. देशातील हा पहिला प्रकल्प आहे.

[jwplayer zkRZAiDB]

पंतप्रधान मोदी यांनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याची प्रसंशा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक तत्वज्ञानावर गेल्या ६५ वर्षांत चिंतन झाले. परंतु त्यांच्या आर्थिक चिंतनावर कृती करण्याचे काम मोदी यांनी केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. येत्या १४ मेपर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पोओएस मशीन पुरवण्यात येतील. याद्वारे १० कोटींचे व्यवहार उद्दिष्टय़े आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत प्रत्येक गावात ऑप्टिकल फायर पोहचवण्यात येईल. १५ हजार ग्राम पंचायती डिजिटल होतील, असे ते म्हणाले.

क्षणचित्रे

  • मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली आणि शेवट ‘बर आहे काय’ या मराठी वाक्याने केला.
  • मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांचे हिंदीतून भाषण दिले.
  • मोदी व्यासपीठावर येताच श्रोत्यांमधून मोदी..मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र परिवर्तनाचे कार्य केल्याचा उल्लेख भाषणाच्या प्रारभीच मोदी यांनी केला. परंतु नंतर मात्र त्यांनी दीक्षाभूमीचा उल्लेख डॉ. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असा केला.

मोदींच्या हस्ते झालेले भूमिपूजन व लोकार्पण

  • ‘भीम आधार पे अ‍ॅप’चे प्रचाराकरिता ‘कॅशबॅक आणि रेफरल बोनस’ योजनेचा शुभारंभ
  • आयआयआयटी, आयआयएम आणि एम्सचे भूमिपूजन. या तीनही इमारती मिहानमध्ये उभारण्यात येणार आहेत.
  • प्रधानमंत्री आवास योजना (राज्यात ४० हजार घरे बांधणार)
  • कोराडी सुपर क्रिटिकल औष्णिक वीज प्रकल्प
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त टपाल तिकीट प्रकाशन

[jwplayer MQEIl6Fk]