साध्वी ऋतंभरा, ज्योतिष्यपीठाच्या शंकराचार्याची उपस्थिती

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा एक प्रयत्न म्हणून विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी हनुमान नगरातील ईश्वर देशमुख शारीरिक क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानात हुंकार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यातील ७९ पेक्षा अधिक संतांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी अयोध्या, बंगलोर आणि नागपूर या ठिकाणी एकाच दिवशी रविवारी सभा होणार आहे. नागपुरात साध्वी ऋतंभरा देवी, ज्योतिष्यपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद महाराज, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोककुमार यांच्यासह राज्यातील विविध भागातील ७० पेक्षा अधिक धर्मपीठांचे  संत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भाजपचे नेते उपस्थित राहतील. सभास्थळी १ लाख लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत.

दुपारी १२ नंतर ईश्वर देशमुख क्रीडा मैदानाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.  सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून बजरंग दलाचे ५०० कार्यकर्ते परिसरात सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत. येताना एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी पाच प्रवेशद्वारे ठेवण्यात आली आहेत. भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.