प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या कारवाईशी आपला काहीही संबध नाही, असे मंगळवारी जाहीर करणारे शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीच ही कारवाई थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केल्याची बाब उघड झाली आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), नागपूर शहरच्या भरारी पथकाने २६ ऑक्टोबरला (सोमवारी) फुटाळा तलाव परिसरात इंडिका कार (क्र. एमएच- ३१, सीए-२६७३)वर कारवाई केली होती. या वाहनाचा दोन वर्षांंपासून व्यावसायिक कर भरण्यात आला नव्हता तसेच गेल्या एक वर्षांपासून वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र नव्हते, असे चौकशीत आढळून आले होते. ही कार जगदीश रामचंद्र तुमाने यांच्या मालकीची होती. ते रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र खासदार कृपाल तुमाने यांनी या प्रकरणाशी माझे काही देणे- घेणे नसून जगदीश तुमाने यांच्याशीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र यासंदर्भात ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध कागदपत्रानुसार वाहन चालकाने खासदार तुमाने यांच्याशी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे बोलणे करवून दिले होते. शासकीय कामात खासदार तुमाने हस्तक्षेप करीत असल्याचा स्पष्ट उल्लेखही कारवाईच्या कागदपत्रात आहे. त्यामुळे तुमाने यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा केलेला खुलासा निर्थक ठरतो.
दरम्यान, परिवहन विभागाच्या कारवाईनंतर जगदीश तुमाने यांनी २७ ऑक्टोबरला नागपूरच्या शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात दंडाची रक्कम भरून गाडी सोडवल्याची माहिती आहे. त्यातच सदर गाडीसह इतरही काही वाहनांच्या कराचाही भरणा करण्यात आला आहे.