‘पदवीधर’च्या संथगतीवर संताप; ८ वाजता मतमोजणीला सुरुवात

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मतमोजणीची प्रक्रिया अतिशय संथगतीने  राबवली गेली. त्यामुळे निकालाचा पहिला कल समजण्यास तब्बल अकरा तास लागले.   सकाळी ८ वाजता  मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणीला  प्रारंभ झाला. मात्र पहिल्या  फेरीचा निकाल जाहीर होण्यास तब्बल ११ तास लागले. २८ टेबलवर  एकाच वेळी मतमोजणी सुरू  झाली. मतपत्रिकेद्वारे घेण्यात आलेल्या या निवडणुकीत  मतपत्रिका एकत्रित करणे आणि टपालच्या मतमोजणीला विलंब झाला. सहा जिल्ह्यातील  मतपेट्या  एकत्र करण्यात आल्या. मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून प्रत्यक्ष मोजणी सुरू होण्याला दुपारी  ३ वाजले. १९ उमेदवारांचे स्वतंत्र डबे तयार करण्यात आले.  त्यानुसार पसंतीक्रम बघून उमेदवाराच्या डब्यात त्यांच्या मतपत्रिकाचे गठ्ठे  टाकण्यात आले व नंतर त्यांची मोजणी करण्यात  आली. ती पूर्ण झाल्यावरही अधिकृतपणे जाहीर करण्यास  सायंकाळी ७  वाजले.  या दरम्यान उमेदवारांचे  प्रतिनिधी मात्र आकडेवारी जाहीर करीत होते. फेरीचे अधिकृत निकाल  जाहीर होण्यास विलंब होत  असताना दुसरीकडे समाजमाध्यमांवर मात्र आकडे झळकत होते.  त्यामुळे आणखी गोंधळात  भर पडत होती. दुसरीकडे अधिकाऱ्यांकडूनही निकालाला विलंब होण्याची कारणे सांगितली जात नव्हती.

…अन् भाजप कार्यकर्ते बाहेर पडले

मतमोजणी केंद्र परिसरात सकाळी भाजप कार्यकत्र्यांची संख्या जास्त होती. संदीप जोशी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतील, असा कार्यकत्र्यांना विश्वास होता. मात्र, दुपारनंतर पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येत असताना काँग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर असल्याचे कळताच भाजपचे कार्यकर्ते बाहेर पडायला लागले. दरम्यान, क्रीडा संकुल परिसरात मतमोजणीचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींना प्रवेशपत्र न मिळाल्याने त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही.  त्यामुळे अनेक प्रतिनिधींनी मुख्य प्रवेशद्वाराच्या मोकळ्या जागेवर बसून वृतांकन केले. त्यानंतर त्यांना आत घेण्यात आले. मतमोजणी केंद्राच्या सर्व बाजूने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच आत प्रवेश दिला जात असल्यामुळे काँग्रेस व भाजप कार्यकत्र्यांची पोलिसांशी वादावादी झाली.

भाजपच्या गोटात स्मशान शांतता

भाजपच्या बालेकिल्ल्यात पक्षाचा उमेदवार पहिल्या फेरीतच मागे असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर प्रसारित होताच भाजपच्या वर्तुळात स्मशान शांतता पसरली. अधिकृत फेरीचे निकाल जाहीर झाले नसताना आकडे बाहेर कसे आले, ते चुकीचे आहेत असा युक्तिवाद भाजपने सुरू केला. मात्र त्याच वेळी प्रसारित झालेले आकडे हे खरे असल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपमधील अस्वस्थता आणखी वाढली. एरवी अधिकृत आकडेवारी घोषित होण्याची वाट न बघणारी भाजपची निवडणूक यंत्रणा त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अवलंबून राहते. हे आकडे पक्षाच्या अनुकूल असले तर ते माध्यमांपर्यंतही पोहचवले जातात. या निवडणुकीत पहिल्या फेरीचे आकडे केंद्रावरील प्रतिनिधीने पाठवलेले व त्यात उमेदवार माघारल्याचे स्पष्ट झाल्याने भाजप नेते अधिकृत आकडेवारी येण्याची वाट पाहात होते. दुसऱ्या फेरीत चित्र पालटेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र फेरीनिहाय निकालात भाजप मागेच पडत असल्याने नेते मंडळी जणू पराभव मान्य करायला लागली.

पहिल्या फेरीत नितेश कराळेंची मुसंडी

संपूर्ण प्रचारादरम्यान कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने दखल न घेतलेले ‘खदखद’ फेम नितेश कराळे यांनी  पहिल्या फेरीपासून तिसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. कराळे हे त्यांच्या ग्रामीण शैलीतील भाषेमुळे  समाजमाध्यमांवर अल्पकाळात प्रकाशझोतात आले होते. ‘पोट्टे हो, समजलं का?’  ही त्यांची स्टाईल प्रसिद्ध आहे. ते वर्धा जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील आहेत. स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेतात. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उडी घेतल्यावर अनेकांनी त्यांची टिंगलटवाळीही केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या ग्रामीण ढंगातच सामाज माध्यमांवर प्रचाराला वेग दिला. त्यांना मिळालेली मते बघून त्यांची लोकप्रियता ही समाजमाध्यमापुरती नव्हे तर  प्रत्यक्षातही आहे हे सिद्ध झाले. दरम्यान, राजकीय पंडितांनी तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल याचा अंदाज बांधला होता. त्यात कराळे कोठेच नव्हते, हे येथे उल्लेखनीय.

मतपत्रिका दिसेना, मतांची बेरीज जुळेना

नागपूर पदवीधर मतदार मोजणीच्या वेळी एक अफलातून प्रकार घडल्याने मतमोजणी यंत्रणेची काही क्षणासाठी तारांबळ उडाली. एक मतपत्रिका दिसली नाही आणि एकत्रित मतांची बेरीज जुळत नव्हती. त्यामुळे यंत्रणा हादरली पण काही वेळातच अर्धी फाटलेली मतपत्रिका टेबलखाली  आढळली आणि यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.