नांदेड, औरंगाबादच्या धर्तीवर ‘एसटी’कडील परिचालनाचा निर्णय अधांतरी;
प्रवासी सेवेच्या प्रतिक्षेत

नांदेड व औरंगाबाद येथील शहर बससेवा खासगी कंपनीकडे दिल्यावर या कंपन्यांनी दिलेल्या निकृष्ट सेवेमुळे ही जबाबदारी पुन्हा शासनाने एसटी महामंडळाकडे सोपवली होती. नागपूरची शहर बससेवा गेल्या अनेक वर्षांपासून खासगी कंपनीकडून निकृष्ट पद्धतीने चालवली जात आहे. त्यानंतरही या सेवेबाबत काहीच निर्णय होत नाही. राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवीन सरकार आल्यावरही ही स्थिती कायम असल्याने नागपूरकरांना शहर बस सेवेबाबत दुय्यम स्थान कशाला? असा प्रश्न नागपूरकर उपस्थित करीत आहेत.
नागपूरला सन २००७ पूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शहर बससेवा दिली जात होती. त्यावेळी एसटीचा हा प्रकल्प फायद्यात होता. परंतु एसटीकडे शहर बससेवेचा विस्तार करण्याकरिता निधीची समस्या असल्याने व शहर बससेवेची जबाबदारी महापालिकेची असल्याने हा प्रकल्प महापालिकेला शासनाकडून हस्तांतरित केला गेला. महापालिकेने स्वत: शहर बससेवा चालवणे अपेक्षित असताना ती वंश निमय प्रा. लि. (स्टारबस) या खासगी कंपनीला करार करून दिली. या कंपनीच्या वतीने स्टारबसची सार्वजनिक प्रवासी सेवा शहरात सुरू करण्यात आली, परंतु कंपनीकडे प्रशिक्षित चालक नसणे, वाहनाच्या दुरुस्तीसाठी कार्यशाळा नसणे यासह इतर अनेक त्रुटी असल्याने हा करारच वादात सापडला.
पहिल्या टप्प्यात कंपनीच्या दुर्लक्षामुळे या बसेस नादुरूस्त होत गेल्या. कंपनीला महापालिकेच्या मदतीने केंद्राच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेचा लाभ मिळाल्याने शेकडो नवीन बसेस उपलब्ध झाल्या. त्यानंतरही कंपनीच्या कामात सुधारणा न झाल्याने निवडक बसेसच रस्त्यांवर उतरल्या. शिल्लक अनेक नवीन बसेस धूळखात पडल्या असतानाच कंपनीकडून त्यांचे टायरसह इंजिनचे वेगवेगळे सुटे भाग काढून जुन्या बस दुरुस्तीसाठी वापरल्या गेले. तेव्हा या नवीन बसेस कंपनीला सुटे भाग वापरण्यासाठी दिल्या का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टारबसकडून परिवहन विभागाचे आजपर्यंतचे विविध करारापोटीचे तब्बल १८ कोटी रुपये थकवण्यात आले आहे. परंतु त्यांनतरही स्टारबसवर कारवाई होताना दिसत नाही.खासगी कंपनीवर नागपूर महापालिकेसह शासनाची कृपादृष्टी कशाला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात काही वर्षांपूर्वी शासनाने नांदेड व औरंगाबाद येथील शहर बससेवा खासगी कंपनीकडे चालवण्याकरिता दिली होती. परंतु तेथेही खासगी कंपनीकडून नागरिकांना निकृष्ट सेवेचा अनुभव आला. तेव्हा नागरिकांमध्ये वाढलेला रोष बघून त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत तेथील सेवा पुन्हा एसटीकडे सोपवली होती. नागपूरच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. नागपूरला स्टारबसमध्ये नागरिकांना निकृष्ट सेवेसह शहरात या बसेसमुळे अपघात वाढतांना दिसत असतांनाही ही सेवा खासगी कंपनीकडे कायम आहे. तेव्हा नागपूरला दुय्यम स्थान का? हा प्रश्न नागपूरकर उपस्थित करीत आहेत.

नागपूरची शहर बससेवा ‘एसटी’कडे सोपवण्याबाबत नागपूर महापालिकेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव वा विचारणा झाली नाही. हा निर्णय आमच्या स्तरावरचा नसून तो घ्यायचा अधिकार शासनाला आहे. शासनाने आदेश दिल्यास ‘एसटी’ ही सेवा घेण्यास सक्षम आहे.
अण्णा गोहत्रे , एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक

शहर बससेवा 
नाशिक, औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, मिरज, वसई, नालासोपारा, चंद्रपूर.