आर्थिक अडचणीतील महापालिकेचे अचाट धाडस

नागपूर : रिकाम्या तिजोरीशी झुंजणारी नागपूर महापालिका एक अचाट धाडस करायला निघाली आहे. पूर्व नागपुरात महापालिकेतर्फे छत्तीसगडी लोक महोत्सव आयोजित केला जाणार असून त्यावर तब्बल ३८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आली आहे.

विशेष  म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मूळचे छत्तीसगडचे नागपूरकर नागरिक भाजपवर नाराज असल्याचे समोर आले होते. यामुळे या महोत्सवाचे प्रथमच आयोजन केले जात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष याच भागाचे प्रतिनिधित्व करतात.

महापालिकेकडून शिक्षण व क्रीडा महोत्सवाअंतर्गत विविध उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यासाठी निधीही दिला जातो. दरवर्षी नागपूर महोत्सव तसेच आदिवासी महोत्सव, सिंधी महोत्सव आयोजित केले जातात. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. पूर्व नागपुरातील विविध भागांत छत्तीसगडी समाजबांधव मोठय़ा प्रमाणात आहेत. ते पूर्वी काँग्रेसचे मतदार होते. परंतु छत्तीसगडी समाजाच्या नेत्या बहरीनबाई यांना भाजपने उपमहापौरपद दिल्यानंतर हा समाज भाजपकडे वळला होता. मात्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या समाजाची  नाराजी दिसली. गेल्या पाच वर्षांत भाजपकडे असलेली समाजाची मते यावेळी पुन्हा काँग्रेसकडे गेल्याचे सव्‍‌र्हेक्षणात समोर आले. विशेषत: डिप्टी सिग्नल , कळमना, चिखली लेआऊट भागात मोठय़ा प्रमाणात छत्तीसगडी समुदाय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका बघता  पूर्व नागपुरात प्रथमच छत्तीसगडी लोक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत असतानाही या महोत्सवासाठी ३८ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साईबाबा महानाटय़, छत्तीसगडी समाजाच्या प्रसिद्ध गायिका तिजनबाई, दिलीप सडंगी, पप्पू चंद्रकार , सुभाष उमरे, सुनील सोनी, दुकालू यादव, अरुण साहू, गरिमा दिवाकर, स्वणा दिवाकर, अल्का चंद्रकार, करण खान, गोविंद साव यांचे कार्यक्रम होणार आहेत.

पूर्व नागपुरात छत्तीसगडी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. छत्तीसगडी कलांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने प्रथमच हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण व क्रीडा विभागाच्या निधीतून या कार्यक्रमासाठी तरतूद करण्यात आली आहे. महोत्सव आयोजित करण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही.

– प्रदीप पोहोणे, अध्यक्ष, स्थायी समिती.