नागपूर : करोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करताना नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी आणि उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे.

परंतु, चाचणी, तपासणी आणि उपचार यासाठी शासन आणि प्रशासनाने दर निश्चित केले आहे. करोना आणि करोनासाठी नसलेल्या रुग्णालयांसाठी शासनाची नियमावली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव असाव्या. २०  टक्के खाटासाठी रुग्णालय व्यवस्थापनाच्या दरानुसार दर आकारू शकतात. या सर्व नियमांचे पालन करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी व नियंत्रणाकरिता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पथक निर्धारित केले आहे. पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे असून पथकाद्वारे शहरातील विविध खासगी रुग्णालयांची आकस्मिक तपासणी केली जाईल. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्याचे आदेशात नमुद आहे.

तर रुग्णालयांवर कारवाई- आयुक्त

यापूर्वी खासगी रुग्णालयांकडून दर आकारणी संदर्भात महापालिकाकडे अनेक तक्रारी मिळत होत्या. यापुढेही नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांनी महापालिकाकडे तक्रार करावी. उपरोक्त पथक तक्रारीची त्वरित दखल घेईल, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा व अन्य संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.