नऊ दिवसांत साडेपाचशे रुग्ण

नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत डेंग्यूचा प्रकोप सुरूच असून गेल्या नऊ दिवसांत येथे ५४० नवीन डेंग्यूग्रस्त आढळले. एकूण रुग्णांमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ६३.३३ टक्के रुग्णांचा समावेश असून या आजारावर नियंत्रण मिळणार कसे हा प्रश्न आहे.

करोना, म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हे आजार नियंत्रणात  असतानाच आता नागपूरसह पूर्व विदर्भात डेंग्यू नियंत्रणात येत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. येथील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडून मात्र सर्वत्र फवारणी सुरू असून हा आजार नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. पूर्व विदर्भात २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान नऊ दिवसांत आढळलेल्या नवीन डेंग्यूग्रस्तांमध्ये नागपूर शहरातील ५२, नागपूर ग्रामीणचे २९०, वर्धा ६२, भंडारा १३, गोंदिया ३१, चंद्रपूर ग्रामीणचे ४६, चंद्रपूर ६, गडचिरोलीतील ६ अशा एकूण ५४० रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमुळे १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नागपूर शहरात आढळलेल्या डेंग्यूग्रस्तांची संख्या आता ६१७, नागपूर ग्रामीण ७९०, वर्धा २५८, भंडारा ३६, गोंदिया १२१, चंद्रपूर ग्रामीण १९३, चंद्रपूर शहर १६७, गडचिरोली २८ अशी एकूण २ हजार २१० रुग्णांवर पोहोचली आहे.

नऊ रुग्णांच्याच मृत्यूची नोंद

आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयात १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान पूर्व विदर्भात केवळ ९ रुग्णांचाच डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात नागपूर शहर ३, नागपूर ग्रामीण ३, वर्धा १, भंडारा १, चंद्रपूर ग्रामीणच्या १ रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात आजपर्यंत डेंग्यूचे ३ मृत्यू झाले आहेत. या रुग्णांच्या मृत्यूची नोंद अद्याप आरोग्य विभागाने घेतली नाही. इतरही बऱ्याच रुग्णालयांतील मृत्यूची नोंद अद्याप आरोग्य विभागातील मृत्यू विश्लेषण समितीची बैठकच झाली नसल्याने झाली नाही. त्यामुळे  मृत्यूचा आकडाही फुगण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पूर्व विदर्भातील डेंग्यूची स्थिती

(१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१)

जिल्हा                      रुग्ण                मृत्यू

नागपूर (श.)              ६१७                       ३

नागपूर (ग्रा.)             ७९०                      ३

वर्धा                         २५८                      १

भंडारा                       ३६                        १

गोंदिया                    १२१                        ०

चंद्रपूर (ग्रा.)               १९३                       १

चंद्रपूर (श.)               १६७                        ०

गडचिरोली                 २८                        ०

एकूण                       २२१०                     ९