मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन

जगाच्या पाठीवर अतिशय प्राचीन भाषा म्हणून मराठीचा उल्लेख केला जातो. मराठी भाषा ही अमृताचा ठेवा असून मराठी भाषेसाठी नागपूरचे बलिदान मोठे आहे. भाषेसाठी एवढे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिले नाही. त्यामुळे जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात होत असल्याचा आनंद आहे. एकविसाव्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठीला विकसित करणे गरजेचे असून मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

१६ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने तीन दिवसीय ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक मराठी संमेलन येथील वनामती सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, यशवंतराव गडाख, गिरीश गांधी व शशिकांत चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, संमेलनाध्यक्ष असलेल्या परदेशातील मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वावर विश्व उभे केले आहे. यातून सामान्य मराठी तरुणाला प्रेरणा मिळत आहे. आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणाऱ्या खूप व्यक्ती असतात. त्या व्यक्तींकडून तरुणाईने खूप काही शिकण्यासारखे आहे.  मराठी भाषेला ज्ञान भाषेचा प्रवास वाढवावा लागेल. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार म्हणाले, व्यवसायानिमित्त परदेशात असलो तरी मनाने आजही मराठी आहे. विदेशात गेलेला मराठी माणूस हा स्वत:च्या हिमतीवर व कष्टाने आपले नाव उज्ज्वल करतो. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेसारख्या देशात संघर्ष करून आपला व्यवसाय उभा केला. ते जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष झाले, ही बाब अभिनंदनीय आहे. रामदास फुटाणे म्हणाले, घरात मराठी बोलले पाहिजे. इंग्रजी ही नोकरीची भाषा आहे, जगण्याची नाही. मराठी जगविण्याची  जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजाचीसुद्धा आहे. राज्यात नववीपर्यंत मराठीला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.  गिरिश गांधी यांनी  संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्तविकात विशद केली. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही  ‘श्री’ ची इच्छा’ या पुस्तकाच्या ५० व्या आवृत्तीचे व ‘पुन्हा श्री गणेशा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार विष्णू मनोहर यांनी मानले.

कर्नाटकात मी कानडी अस्मिता बघितली, तामिळनाडूत मला तामिळ अस्मितेचा अनुभव आला. परंतु आपली मराठी अस्मिता का जागत नाही, हा प्रश्नच आहे. मराठी भाषेच्या या संमेलनासाठी आधीच छोटे सभागृह घेण्यात आले आणि तेही अध्रेच भरले, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शहरातील महाविद्यालयीन मराठीच्या विद्यार्थ्यांना आणि मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांना नुसता निरोप देऊन उपयोग नाही. ते संमेलनाला यावे, यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवे होते, याकडेही गडकरी यांनी आयोजकांचे लक्ष वेधले.